लातूरला प्रथमच राज्यस्तरीय जलतरण शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन

0
79

१६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान जलतरणपटूंची मेजवानी

लातूर, दि. १५ : राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत २०२५-२६ या वर्षी आयोजित राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांपैकी जलतरण स्पर्धेचे आयोजन यंदा प्रथमच लातूर येथे होत आहे. लातूर जिल्हा क्रीडा परिषद व शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान हरंगुळ रेल्वे स्टेशनजवळील महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलात पार पडणार आहेत.

या स्पर्धेत राज्यातील अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, लातूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर व शिवछत्रपती क्रीडापीठ या नऊ विभागांतून १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुला-मुलींसह सुमारे एक हजार खेळाडू, संघव्यवस्थापक व तांत्रिक अधिकारी सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी जलतरण तलाव पूर्णपणे सज्ज असून, खेळाडूंची निवासव्यवस्था संकुलातील तसेच सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा परिषदेच्या अध्यक्षा वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती कार्यरत आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील यांच्या हस्ते १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता उद्घाटन समारंभ होणार असून, अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख असतील. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. अनिरुद्ध जाधव, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे व जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेत पुणे विभागातील आंतरराष्ट्रीय खेळाडू त्विशा दिक्षीत, कोल्हापूर विभागातील राष्ट्रीय पदकविजेता अथर्वराज पाटील, मुंबई विभागातील साईमिरा मेहरोत्रा, तसेच शिवछत्रपती क्रीडापीठातील चैतन्य शिंदे व श्रीलेखा पारिख यांसह अनेक दिग्गज जलतरणपटू सहभागी होत आहेत.

लातूरमध्ये प्रथमच होणाऱ्या या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेमुळे जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटूंच्या खेळाचे कौशल्य जवळून अनुभवण्याची संधी मिळणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. गव्हाणे व क्रीडा अधिकारी कसगावडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here