साहित्य सारथी कलामंचच्या वर्धापन दिनानिमित्त रसिकांना मिळाली साहित्यिक मेजवानी

0
104

कविसंमेलन, गझल मुशायरा व राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाने कार्यक्रम रंगला

लातूर : साहित्य सारथी कला मंच या संस्थेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (दि. १२ ऑक्टोबर २०२५) जयक्रांती महाविद्यालयाच्या सभागृहात एकदिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. दिवसभर चाललेल्या या संमेलनात गझल मुशायरा, कविसंमेलन, बालनाट्य सादरीकरण आणि साहित्य सारथी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण असे चार सत्र आयोजित करण्यात आले होते.

पहिल्या सत्रात झालेल्या गझल मुशायराचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक दयानंद पाटील होते. उद्घाटन ॲड. गणेश गोमचाळे यांनी केले, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गझलकार योगिराज माने, प्रा. डॉ. पल्लवी पाटील आणि गझलकार विमल मुदाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन अजहर शेख व श्याम माने यांनी केले.

दुसऱ्या सत्रातील कविसंमेलनात अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी भारत सातपुते होते. प्रमुख पाहुणे म्हणून कवी नरसिंग इंगळे, कवी दयानंद बिराजदार आणि प्रा. डॉ. नयन राजमाने उपस्थित होते. या सत्राचे सूत्रसंचालन कवी गोविंद श्रीमंगले आणि समिंदर शिंदे यांनी केले. राज्यभरातून तब्बल ६५ कवींनी सहभाग नोंदवून रसिकांना कवितांचा बहारदार आस्वाद दिला.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते साहित्य सारथी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभाचे. या समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे (विभागीय संपादक, नवराष्ट्र) होते. उद्घाटक म्हणून शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष विवेक सौताडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा दीपाली औटे उपस्थित होत्या.

प्रमुख अतिथी दीपाली औटे म्हणाल्या, “महिलांनी साहित्य क्षेत्रातही पुरुषांच्या बरोबरीने वाटचाल करणे आवश्यक आहे.” तर विवेक सौताडेकर यांनी सांगितले की, “साहित्य हे स्वनिर्मित असावे; साहित्यचौर्य हा वाढता प्रकार थांबवण्यासाठी नवोदितांना मंच उपलब्ध करून द्यावेत.”

उद्घाटनपर भाषणात संतोष सोमवंशी यांनी राजकारणी मंडळींनीही साहित्याशी नाते ठेवावे, कारण “साहित्यामुळे माणूस प्रगल्भ होतो,” असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात जयप्रकाश दगडे यांनी म्हटले, “साहित्य हे समाजसुधारणेचे प्रभावी तंत्र असून कवी-लेखकांनी या कार्यात एकत्र यावे.”

या वेळी कलारत्न, काव्यरत्न, हास्य कविरत्न, कृषिरत्न, समाजरत्न, आरोग्यरत्न, पत्रकाररत्न, उद्योगरत्न, साहित्य गौरव, जीवन गौरव आदी विविध क्षेत्रातील ३० मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. विशेष सन्मान म्हणून डॉ. उमाकांत जाधव (राज्य शिक्षक पुरस्कार), वसुंधरा वृक्ष टीम (गणपती देखावा द्वितीय पारितोषिक) आणि सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग खुडे गुरुजी (जीवन गौरव पुरस्कार) यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष कवी सुरेश धोत्रे यांनी केले, सूत्रसंचालन गणेश परळे यांनी तर आभार प्रदर्शन अध्यक्ष गंगाधर डिगोळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशासाठी गंगाधर डिगोळे, शादूल बौडीवाले, गणेश परळे, संजय राजूळे, राघवेंद्र देबडवार, प्रमोद टेकले, संतोष सोनवणे आणि अमित भालके यांनी परिश्रम घेतले.

दिवसभर चाललेल्या या साहित्यिक सोहळ्याला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भरभरून दाद दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here