जागतिक नेत्रदान दिनानिमित्त डॉक्टर भालचंद्र नेत्र स्मृती दिवस साजरा
लातूर, दि. १० जून : ज्येष्ठ नागरिक संघ व विमल आय हॉस्पिटल, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक नेत्रदान दिनानिमित्त डॉक्टर भालचंद्र नेत्र स्मृती दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष डॉ. काशिनाथराव सलगर होते. प्रमुख अतिथी म्हणून विमल आय हॉस्पिटलचे डॉ. दत्तात्रय शिंदे, ममता हॉस्पिटलचे डॉ. मधुकरराव कुलकर्णी तसेच डॉ. सी. एन. जोशी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. दत्तात्रय शिंदे यांनी नेत्रदान चळवळीबाबत जनजागृतीची आवश्यकता अधोरेखित केली. नेत्रदान चळवळ काही प्रमाणात थंडावली असून तरुणांनी या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. मात्र समाजात डोळ्यांविषयी असलेल्या अंधश्रद्धांमुळे अनेकजण नेत्रदानासाठी पुढे येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
डॉ. मधुकरराव कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात डॉक्टर भालचंद्र यांच्या सहवासातील आठवणींना उजाळा दिला. त्यांचा जन्म आणि निधनाचा दिवस १० जून हाच असल्याचे सांगून त्यांनी डॉक्टर भालचंद्र यांच्या कार्याचा गौरव केला. लातूर येथे त्यांचे शिक्षण झाले असून वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली. प्रेमळ स्वभाव, अचूक निदान आणि रुग्णसेवेतील तत्परता ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये होती. परभणी, नाशिक, धाराशिवसह विविध भागांत त्यांनी लाखो नेत्रशस्त्रक्रिया केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सी. एन. जोशी यांनीही डॉक्टर भालचंद्र यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ. काशिनाथराव सलगर यांनी केला. यावेळी आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरात ५५ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. डॉ. दत्तात्रय शिंदे यांनी प्राथमिक स्वरूपात काही रुग्णांची तपासणी केली. त्यानंतर त्यांच्या टीममधील कृष्णा गायकवाड, प्रकल्प संयोजक संतोष पवार, किशोर खंबीरे आणि रवींद्र माळी यांनी तपासणीचे काम पार पाडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश घादगिने यांनी केले. आभार वसंत भेंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश भोयरेकर, प्रकाश निला, शहाजी गाडगे, प्रकाश घादगिने आदींनी विशेष परिश्रम घेतले.