Home News पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन अर्ज दाखल नाही;मात्र १४४ अर्जांची विक्री

पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन अर्ज दाखल नाही;मात्र १४४ अर्जांची विक्री

0
68

लातूर, शहर प्रतिनि्ाधी : लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली असली, तरी पहिल्याच दिवशी एकाही उमेदवाराने प्रत्यक्ष नामनिर्देशन अर्ज दाखल केला नाही. मात्र दुसरीकडे इच्छुक उमेदवारांकडून नामनिर्देशन अर्ज खरेदी करण्यासाठी मोठी हालचाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विविध कार्यालयांमार्फत प्रभागनिहाय नामनिर्देशन अर्जांची विक्री करण्यात आली. यामध्ये प्रभाग क्रमांक १ मध्ये ८, प्रभाग २ मध्ये १६, प्रभाग ३ मध्ये ९, प्रभाग ४ मध्ये १८, तर प्रभाग ५ मध्ये सर्वाधिक २१ अर्जांची विक्री झाली. प्रभाग ६ मध्ये ९ अर्ज विकले गेले, तर प्रभाग ७ मध्ये एकही अर्ज विक्री झाल्याची नोंद नाही. प्रभाग ८ मध्ये ६, प्रभाग ९ मध्ये ३ आणि प्रभाग १० मध्ये ५ अर्जांची विक्री झाली. प्रभाग ११ मध्ये अर्ज विक्री शून्य राहिली, तर प्रभाग १२ मध्ये ५ अर्ज विकले गेले. प्रभाग १३ मध्ये १८, प्रभाग १४ मध्ये ८, प्रभाग १५ मध्ये ९ आणि प्रभाग १६ मध्ये ९ अर्जांची विक्री झाली. प्रभाग १७ आणि १८ मध्ये मात्र पहिल्या दिवशी एकही अर्ज विक्री झालेला नाही.क्षेत्रीय, उपविभागीय तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयांमधून एकूण मोठ्या प्रमाणावर नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली असून, यावरून अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे. पहिल्या दिवशी उमेदवार व राजकीय पक्षांचे पदाधिकारी हे अर्ज प्रक्रिया समजून घेणे, कागदपत्रांची पूर्तता करणे आणि मतदार यादीची तपासणी करण्यात व्यस्त होते.निवडणूक प्रशासनाने अर्ज स्वीकारण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असून, आगामी काही दिवसांत तसेच शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर नामनिर्देशन अर्ज दाखल होतील, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here