
लातूर, दि. २० : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री, लातूरचे सुपुत्र लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १४व्या स्मृतिदिनानिमित्त लातूर शहर व जिल्ह्यात भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आयएमए, इंडियन डेंटल असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन, निमा आणि विलासराव देशमुख फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात ३०० हून अधिक खासगी रुग्णालये आणि एक हजारपेक्षा अधिक डॉक्टर सहभागी झाले आहेत.
शिबिरात दिवसभर हजारो सर्वसामान्य रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार रुग्णांना उपचार आणि पुढील वैद्यकीय मार्गदर्शनही देण्यात येत आहे.
अहोरात्र लोकसेवेत सक्रिय राहिलेल्या विलासराव देशमुख यांच्या स्मृतींना आरोग्यसेवेतून आदरांजली अर्पण करण्याचा डॉक्टरांचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. मागील तेरा वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमातून सर्वसामान्य नागरिकांना मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळत आहे.
विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त एवढ्या मोठ्या संख्येने डॉक्टर एकत्र येऊन मोफत आरोग्यसेवेच्या माध्यमातून आदरांजली अर्पण करण्याचा हा उपक्रम राज्यासह देशासाठीही प्रेरणादायी असल्याचे सांगण्यात आले.
महाआरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व आरोग्य संघटना तसेच सहभागी डॉक्टरांचे लोकप्रतिनिधी म्हणून मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.



