
लातूर : दि. ८ नोव्हेंबर २०२६
शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी स्थापन झालेल्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांच्या हिताऐवजी एका कुटुंबाचे आर्थिक हित जपले जात असल्याचा आरोप करत बँकेच्या कारभारात परिवर्तन घडविण्यासाठी महायुतीने निवडणुकीत ताकद लावली आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून महायुती निवडणुकीच्या मैदानात उतरली असून जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा फडकविणारच, असा ठाम विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवार, ८ नोव्हेंबर रोजी आमदार रमेशआप्पा कराड यांच्या लातूर येथील भाजपा संवाद कार्यालयात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनलच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार बसवराज पाटील, माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार रमेशआप्पा कराड, माजी मंत्री विनायकराव पाटील, अॅड. बळवंतराव जाधव, गणेशदादा हाके, बब्रुवान खंदाडे, त्र्यंबकआबा गुट्टे, संतोष सोमवंशी, दिलीपराव देशमुख, अशोककाका केंद्रे, विक्रमकाका शिंदे, उमेदवार ऋषिकेश कराड, गिरीश पाटील, शरद शिंदे यांच्यासह महायुतीतील भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महायुती एकजुटीने निवडणूक लढविणार
सहकार चळवळ अधिक मजबूत आणि लोकाभिमुख व्हावी, यासाठी केंद्रात अमित शाह, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार सहकार क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेत असल्याचे सांगून आमदार बसवराज पाटील म्हणाले की, लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून महायुतीचे सर्व नेते एकत्र आले आहेत. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून सक्षम आणि अनुभवी उमेदवार निवडणुकीत उतरविण्यात आले आहेत. या पॅनलला कपबशी हे चिन्ह मिळाले असून सरकारचाही पाठिंबा आहे. सर्व नेते एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाणार असून महायुतीचा झेंडा जिल्हा बँकेवर फडकविणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न; संभाजीराव पाटील निलंगेकर यांची टीका
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेतकरी हिताच्या धोरणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून परिवर्तन पॅनलला त्यांचे नाव देण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी महायुती ठामपणे उभी राहील, असे सांगताना आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. सत्ताधाऱ्यांना आपल्या कामावर विश्वास असता तर त्यांनी कोणाच्याही अर्जावर आक्षेप घेतले नसते. सर्वांना निवडणूक लढवू दिली असती. मात्र, इच्छुकांना रात्रीतून उचलून नेणे, घोडेबाजार करणे असे प्रकार घडले. हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा खून असल्याचा आरोप त्यांनी केला.
बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे प्रश्न आणि बँकेच्या कारभारावर चर्चा होणे अपेक्षित असताना सत्ताधाऱ्यांकडून व्यक्तिगत टीका करून संभ्रम निर्माण केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रदूषण करणारे फटाके वाजविणे बंद करा, असा टोलाही त्यांनी लगावला.
महायुतीच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात
महायुतीचा धर्म पाळत मागील काळातील सर्व निवडणुकांमध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकदिलाने काम केले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही महायुतीच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. आपण स्वतः, आमदार विक्रम काळे आणि प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण जिल्हाभर दौरे करून प्रचार करणार असल्याचे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले. सक्षम उमेदवार दिल्यामुळे जिल्हा बँक महायुतीच्या ताब्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना नव्हे, एका कुटुंबाला आर्थिक स्थैर्य
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर लिमिटेड कंपनीसाठी चालविला जात असल्याचा आरोप आमदार रमेशआप्पा कराड यांनी केला. गेल्या २५ वर्षांत शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्याऐवजी केवळ एका कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळाले, अशी टीका त्यांनी केली.
शेतकऱ्यांना बिनव्याजी पाच लाख रुपयांचे कर्ज किती जणांना दिले, हे सत्ताधाऱ्यांनी जाहीर करावे, असे आव्हान त्यांनी दिले. देश एग्रोला महिनाभराच्या आत कोट्यवधी रुपयांचे कर्ज देण्याची तत्परता दाखविणाऱ्या जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज देताना अशी तत्परता का दाखविली जात नाही? तसेच ३० ते ४० वर्षांनंतरही मांजरा साखर कारखाना कर्जबाजारी कसा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदार महायुतीच्या बाजूने असून बँकेत निश्चितपणे परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकीनंतर महायुतीचाच चेअरमन होणार
जिल्हा बँकेने महाराष्ट्रात सर्वात चांगले काम केले असेल तर निवडणुकीला सामोरे जाण्यास घाबरता कशाला, असा सवाल माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी उपस्थित केला. किती दिवस निवडणुकीपासून दूर राहणार? ज्या दिवशी जनतेसमोर याल, त्या दिवशी जनता हिशेब केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सहकार मंत्र्यांनी नेमका कोणता युतीधर्म पाळला, असा प्रश्न उपस्थित करत जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर महायुतीचाच चेअरमन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेच्या शेवटी चंद्रकांत कातळे यांनी उपस्थित पत्रकारांचे आभार मानले. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



