महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, आवाहन

लातूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीच्या निमित्ताने सिद्धेश्वर यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत पार पडणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. यात्रा महोत्सवासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून अधिकाधिक भाविक व नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थानचे प्रशासक सचिन जांबूतकर व विश्वस्तांनी केले आहे.
राज्यभर प्रसिद्ध असलेला लातूर येथील सिद्धेश्वर व रत्नेश्वर यात्रा महोत्सव महाशिवरात्रीदिनी, म्हणजेच १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने शनिवार मध्यरात्री व रविवार पहाटे गवळी समाजाच्या वतीने श्री सिद्धेश्वराला दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर श्रींच्या दर्शन सोहळ्याला प्रारंभ होईल. रविवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते श्रींची महापूजा होऊन झेंडावंदनाने यात्रा महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. यानंतर संत सावतामाळी भजनी मंडळ व माळी समाजाच्या वतीने माळी गल्ली येथून मिरवणूक काढून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
याच दिवशी दुपारी १ वाजता मार्केट यार्ड परिसरातील गौरीशंकर मंदिर येथून पारंपरिक झेंड्यांच्या काठ्यांची मिरवणूक काढण्यात येणार असून तिचा समारोप सिद्धेश्वर मंदिरात होणार आहे. रात्री ९ ते ११ या वेळेत हभप संजय महाराज खडक उमरगेकर यांचे कीर्तन होणार असून त्यानंतर रात्री ११ ते १ दरम्यान सुरमणी बाबुराव बोरगावकर व तालमणी रामभाऊ बोरगावकर यांचे संगीत भजन होईल.
१६ फेब्रुवारी रोजी वीरशैव तेली समाजाच्या वतीने श्रींना गंगेच्या पाण्याचा अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर आळंदी येथील हभप माऊली महाराज कदम यांचे कीर्तन होईल. १७ फेब्रुवारी रोजी हभप ज्ञानसिंधू संदीपान महाराज हासेगावकर यांचे कीर्तन, तर १८ फेब्रुवारी रोजी हभप पुंडलीक महाराज देहूकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
१९ फेब्रुवारी रोजी हभप गुरुराज महाराज देगलुरकर यांचे कीर्तन होणार असून २० फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथील हभप गोपाळअण्णा महाराज वासकर यांचे कीर्तन पार पडणार आहे. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी हभप गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्री भजन आणि रात्री हभप विजयानंद महाराज सुपेकर यांचे कीर्तन होणार आहे.
२२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत १००१ महिलांच्या उपस्थितीत श्रींचा रुद्राभिषेक करण्यात येणार आहे. यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून रात्री शिवरुद्र स्वामी यांचे संगीत भजन होईल. २३ व २४ फेब्रुवारी रोजी अनुक्रमे सचिन जाधव, वैष्णवी बरकते व संतोष थोरात यांचे संगीत भजन होणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी डॉ. दत्ता राजे यांचे संगीत भजन आयोजित करण्यात आले आहे.
२६ फेब्रुवारी रोजी सकाळी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून देवस्थान परिसरात पशु व पक्षी प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. उत्कृष्ट पशु व पक्ष्यांची निवड स्पर्धा घेण्यात येणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी पशु, अश्व व श्वान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून उत्कृष्ट पशु, अश्व व श्वान यांची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या पशूंना लातूर बाजार समितीच्या वतीने चांदीचा रथ देऊन पशुमालकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
२८ फेब्रुवारी रोजी सुरमणी भुजंग मुर्के यांचे भजन होणार असून १ मार्च रोजी सिद्धेश्वर व रत्नेश्वर भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम होईल. त्याच दिवशी देवस्थान परिसरात सकाळी ११.३० पासून कुस्ती स्पर्धांचा फड रंगणार आहे.
२ मार्च रोजी रात्री ८ वाजता उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांच्या उपस्थितीत शोभेच्या दारूची आतषबाजी करून यात्रा महोत्सवाचा समारोप होईल. त्यानंतर पंढरपूर येथील हभप माधव महाराज शिवणीकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन श्रींची मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच दहीहंडी व महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे.
यात्रा महोत्सव १५ दिवस चालणार असून यंदा आनंद मेळा, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच अनेक आकर्षणे भाविकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. लातूर जिल्ह्यासह इतर जिल्हे व राज्यांतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासक सचिन जांबूतकर यांच्यासह विश्वस्त विक्रम गोजमगुंडे, श्रीनिवास लाहोटी, प्रदीप राठी, मन्मथ लोखंडे, बाबासाहेब कोरे, अशोक भोसले, नरेश पंड्या, सुरेश गोजमगुंडे, रमेशसिंह बिसेन, चंद्रकांत परदेशी व व्यंकटेश हालिंगे यांनी केले आहे.

चौकट : रक्तदात्यास थेट दर्शन
यात्रा महोत्सवानिमित्त लातूर येथील डॉ. भालचंद्र ब्लड बँकेच्या वतीने देवस्थान परिसरात महाशिवरात्रीच्या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सिद्धेश्वराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असल्याने रक्तदान करणाऱ्या दात्यांना थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकाधिक भाविकांनी या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
