मुंबई : दि. २५ नोव्हेंबर २०२६
महसूल विभागातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या अर्धन्यायिक प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणाली लागू करण्यासह ‘एक जिल्हा, एक अपील’ ही पद्धत राबविण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महसूल विभागांतर्गत विविध स्तरांवर जमिनीशी संबंधित अर्धन्यायिक प्रकरणे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. जमिनीच्या मालकी हक्कांपासून ते हस्तांतरण आणि विकासकामांपर्यंत अनेक बाबींवर या प्रकरणांचा परिणाम होत असतो. प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो, तसेच शासनाच्या महसुलावरही परिणाम होतो.
ही परिस्थिती बदलण्यासाठी महसूल न्यायालयीन दावा व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून अर्धन्यायिक प्रकरणांची सुनावणी ऑनलाइन पद्धतीने घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
तसेच अपिलांचे अनावश्यक टप्पे कमी करून प्रकरणे निर्धारित वेळेत निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी ‘एक जिल्हा, एक अपील’ ही पद्धत लागू करण्याचे नियोजन आहे.
या बदलांसाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येणार असून संबंधित विधेयकातील बदलांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
या निर्णयामुळे महसूल न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे कमी होण्यास, जमिनीशी संबंधित व्यवहारांना गती मिळण्यास आणि नागरिकांचा वेळ व खर्च वाचण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

