लातूर, शहर प्रतिनिधी : लातूरमध्ये अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेल्या प्रकरणात लातूर शहर पोलिसांनी मुख्य आरोपीसोबत दोन कॅफे चालकांना अटक केली आहे. पोस्टे शिवाजी नगर येथे गुन्हा क्र. ४६८/२०२५ अंतर्गत बीएनएस कलम १३७ (२) प्रमाणे ४ डिसेंबर रोजी अल्पवयीन मुलगी गायब झाल्याची तक्रार दाखल झाली होती.तपासादरम्यान मसपोनि सुप्रिया केंद्रे यांनी तातडीने पिडीत मुलीचा शोध लावला. चौकशीदरम्यान पिडीत मुलीने सांगितले की, रिहान गुलाब शेख (१८, रा. सेलू, ता. औसा) याने जबरदस्तीने तिला पळवून नेले आणि कॅफे डेली ग्रीन्ड (खंडेकर स्टॉप, औसा रोड) तसेच एस.पी. कॅफे डेअर (खाडगाव टी पॉइंट, रिंग रोड) येथे नेऊन तिच्यावर जबरी अत्याचार केला. या माहितीच्या आधारे गुन्ह्यात बीएनएस कलमे ६४, ६५, ६९, ३५१(२) तसेच पोक्सोचे कलम ४, ६, ८, १२ आणि अ.जा.ज.अ.प्र.का. १९८९ मधील कलमे जोडण्यात आली. प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्याकडे वर्ग करण्यात आला.तपास अधिकारी साळवे यांनी मुख्य आरोपी रिहान गुलाब शेख याला ४ डिसेंबरला अटक केली असून ५ डिसेंबरला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. पुढे तपासात असे निष्पन्न झाले की, अत्याचार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन गुन्ह्यास सहाय्य करणारे दोन कॅफे चालक—१) सुरज राजेश ढगे (२९, चालक — एस.पी. कॅफे डेअर, रा. द्वारकापुरी अपार्टमेंट, खाडगाव रोड)२) अनिकेत अजय कोटुळे (२७, चालक — कॅफे डेली ग्रीन्ड, रा. साई रोड, लातूर)हेही गुन्ह्यात सामील आहेत. त्यामुळे गुन्ह्यात पोक्सो कलम १७ वाढवून दोघांनाही ५ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आला आहे.या प्रकरणात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या साहाय्याने तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले असून तपास सुरू आहे. संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासात सुप्रिया केंद्रे, तसेच पोलीस कर्मचारी महेश पारडे, गणेश मोरे, मिलींद कांबळे, पांडुरंग सगरे, राहुल क्षिरसागर आणि फॉरेन्सिक पथकातील अर्जुन मुळे, श्रुती पंचगल्ले यांनी सहकार्य केले.पोलीस दलाचे आवाहनलातूर जिल्हा पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, अल्पवयीन मुलींना पळवून नेऊन अत्याचार करण्यास मदत करणाऱ्यांवर— मग ते मित्र, नातेवाईक किंवा लॉज, हॉटेल, कॅफे, कॉफी शॉप चालक असोत— पोक्सो कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल. गुन्ह्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, कोणत्याही स्वरूपाची मदत करणे किंवा माहिती लपविणे यामुळे संबंधितांनाही सहआरोपी ठरवून अटक केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
