लातूरमध्ये महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद उत्साहात संपन्न

0
132

लातूर, 11 ऑक्टोबर 2025: महाराष्ट्र राज्य स्त्री मुक्ती परिषद व लातूर जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या वतीने जिल्हास्तरीय स्त्री मुक्ती परिषद हॉटेल अंजनी येथे उत्साहात पार पडली.

परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी आयसीडीएस विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, गटविकास अधिकारी शाम गोडबोले, डॉ. स्मिता शहापूरकर, प्रा. डॉ. अशोक नारनवरे, सुनीता बागल, संध्या गोखले (मुंबई) आदी मान्यवर उपस्थित होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

करू पहिलं नमन ज्योतिबाला” या गीताने वातावरण भारले. स्त्री संघर्षाची पाच दशके या पुस्तकाचे वितरण करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रा. चंद्रकला भार्गव यांनी स्त्रियांच्या सामाजिक, आर्थिक व कायदेशीर परिस्थितीवर प्रास्ताविक मांडले.

या प्रसंगी हरिश्चंद्र सुडे (ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान, बुधोडा) यांचा “मराठवाडा भूषण पुरस्कार” प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. श्री. जावेद शेख यांनी स्त्रीवाद व महिलांच्या सशक्तीकरणावर प्रेरणादायी भाषण केले.

उपप्राचार्य सुचेता शास्त्री-वाघमारेसुनिता कुलकर्णी यांनी “स्त्रीवादी परिवर्तन” या विषयावर नाट्यरूप सादरीकरण केले. प्रा. डॉ. अशोक नारनवरे यांनी मनुस्मृती आणि भारतीय राज्यघटना यांचा तुलनात्मक अभ्यास सादर केला.

सुनीता बागल (मुंबई) यांनी स्त्रियांवरील सामाजिक अन्याय, आत्महत्यांचे प्रमाण, हुंडाबळी, मुलींचा घटता जन्मदर या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले. त्यांनी महिला बचतगट, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांनी स्त्रीवादी विचारांचा प्रसार करावा, असे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. स्मिता शहापूरकर यांनी स्त्रियांच्या शिक्षण, संरक्षण आणि सन्मान हे संविधानिक अधिकार असल्याचे सांगितले. परिषदेतील ठरावांमध्ये स्त्री-सुरक्षेसाठी सार्वजनिक ठिकाणे निर्माण करणे, पूरग्रस्त महिलांना मदत, मनरेगा निधी वाढवणे आणि जागतिक शांतीसाठी प्रयत्न यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दत्तात्रय सुरवसे यांनी केले तर ॲड. सुजाता माने यांनी आभार प्रदर्शन केले. लातूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here