लातूर, शहर प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात जातीनिहाय आरक्षण, सरकारी नोकरी आणि आर्थिक मोबदल्याच्या मागण्यांसाठी काहींनी आत्महत्येचा प्रयत्न केला किंवा आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमध्ये मृत किंवा जखमी व्यक्तींनी लिहिल्याचा दावा असलेल्या चिठ्ठ्या सापडल्या होत्या आणि त्या प्रसारमाध्यमांमध्येही प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र लातूर पोलिसांच्या तपासानंतर या चिठ्ठ्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२६ ऑगस्ट रोजी अहमदपूर तालुक्यातील बळीराम श्रीपती मुळे यांनी विषप्राशन केले होते. त्याच्या नावाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची चिठ्ठी सापडली होती. त्याचप्रमाणे १३ सप्टेंबर रोजी निलंगा तालुक्यातील शिवाजी वाल्मीक मेळ्ळे यांचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला. नंतर त्याच्या घरातून मिळालेल्या चिठ्ठीत महादेव कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र न मिळाल्याची तक्रार होती. १४ सप्टेंबर रोजी चाकूर तालुक्यातील अनिल बळीराम राठोड याचा करंट लागून मृत्यू झाला होता, आणि त्याच्याही नावाने बंजारा समाजासाठी आरक्षण मागणी करणारी चिठ्ठी सादर करण्यात आली होती.
या तिन्ही प्रकरणांचा सखोल तपास केल्यानंतर पोलिसांनी मृतकांचे आणि चिठ्ठ्यांवरील हस्ताक्षरांची तुलना केली. तपासात हस्ताक्षरे जुळत नसल्याचे समोर आले. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि संशयितांची चौकशी केल्यानंतर या चिठ्ठ्या प्रत्यक्षात मृत व्यक्तींनी नव्हे तर त्यांच्या नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांनी बनावट तयार केल्याचे उघड झाले. गुन्हे परीक्षण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या अहवालानुसार तिन्ही चिठ्ठ्या संबंधित संशयितांनीच लिहिलेल्या असल्याचे निष्पन्न झाले.
अहमदपूर प्रकरणात बळीराम मुळे याची चिठ्ठी त्याचा चुलत भाऊ संभाजी ऊर्फ धनाजी मुळे याने लिहिल्याचे, निलंगा प्रकरणात शिवाजी मेळ्ळे याची चिठ्ठी माधव रामराव पिटले याने लिहिल्याचे, तर चाकूर प्रकरणात अनिल राठोड याची चिठ्ठी शिवाजी फत्तु जाधव, नरेंद्र विठ्ठल जक्कलवाड आणि तानाजी मधुकर जाधव यांनी संगनमत करून लिहिल्याचे तपासात समोर आले आहे.
या सर्वांनी शासनावर दबाव आणण्यासाठी आणि आर्थिक मोबदला मिळविण्यासाठी खोट्या चिठ्ठ्या तयार करून त्या आत्महत्याग्रस्तांनी लिहिल्याचे भासवले होते. त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक बनावट दस्तऐवज तयार करून पोलिसांना आणि शासनाला चुकीची माहिती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात सर्व संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. शासनाला आणि समाजाला दिशाभूल करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा लातूर पोलिसांनी दिला आहे. यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांची उपस्थिती होती.




