लातूर, शहर प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याशी एका वकिलाने केलेल्या गैरवर्तनाचा लातूर बार असोसिएशनतर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच बुधवारी लातूर जिल्हा न्यायालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मोर्चा काढण्यात आला. या घटनेबाबत असोसिएशनने राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. असोसिएशनच्या विशेष सर्वसाधारण सभेत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ठरावात नमूद करण्यात आले की, न्यायमूर्ती गवई यांच्या संदर्भात न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान काही वकिलाने दाखवलेले अनैतिक आणि अपमानास्पद वर्तन हे अत्यंत निंदनीय असून न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का देणारे आहे. या पार्श्वभूमीवर लातूर बार असोसिएशनने दिल्लीतील बार कौन्सिल ऑफ युनियन टेरिटरीकडे संबंधित वकिलाचे सनद तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाने अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कायदेशीर पातळीवर कठोर उपाययोजना कराव्यात, अशी विनंती केली आहे. या निवेदनावर असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. योगेश जगताप आणि सचिव अॅड. गणेश गोजामगुंडे यांच्या स्वाक्षऱ्या असून, न्यायव्यवस्थेच्या सन्मानासाठी देशभरातील वकिलांनी एकत्र येऊन आवाज उठवावा, असेही या निवेदनातून आवाहन करण्यात आले. मोर्चात मोठ्यासंख््येने वकिलांनी सहभाग नोंदविला होता.


