लातूर : दि. ९ नोव्हेंबर २०२६
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलंगा आणि औसा परिसरात ८ नोव्हेंबर रोजी घडलेल्या कथित प्रकारांची गंभीर दखल घेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. मतदारांना धमकावणे, दबाव आणणे आणि मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचे प्रकार रोखावेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
श्री. विनोद राजेंद्र वीर यांनी औसा पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीनुसार, त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना अडवून धमकावणे, मारहाण करणे, मोबाईल फोन जबरदस्तीने घेणे तसेच इच्छेविरुद्ध दुसऱ्या वाहनात बसविण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या कथित घटनेमुळे मतदारांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता काँग्रेसने निवेदनातून व्यक्त केली आहे.
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक मतदाराला कोणत्याही राजकीय दबावाशिवाय आणि धमकीशिवाय मतदान करण्याचा अधिकार आहे. सहकारी बँकेची निवडणूकही लोकशाही मूल्यांच्या आधारे पार पडली पाहिजे. कोणत्याही व्यक्तीने किंवा गटाने बळाचा वापर करून मतदारांवर दबाव आणणे अथवा त्यांना मतदानापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची निवडणुकीच्या अनुषंगाने चौकशी करावी, आवश्यकतेनुसार पोलीस प्रशासनाकडून अहवाल मागवावा, सर्व पात्र मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे याची खात्री करावी, सर्व मतदान केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवावा तसेच संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय मतदारांना धमकावणे, प्रलोभन देणे, बळजबरी करणे अथवा मतदानापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी. मतदारांसाठी तक्रार नोंदविण्याची स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून द्यावी आणि निवेदनावर केलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशीही मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही सहकार क्षेत्रातील महत्त्वाची लोकशाही प्रक्रिया असून, प्रत्येक मतदाराला स्वतःच्या इच्छेने मतदान करता आले पाहिजे. निवडणूक प्रक्रियेवरील मतदारांचा विश्वास कायम राखण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे.
यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.




