
उदगीर : दि. ८ नोव्हेंबर २०२६
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १३ लाख ७७ हजार ९६० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन जप्त करण्यात आले असून, नांदेड येथील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दिनांक ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास उदगीर येथील लोणी मोड परिसरात महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ (एमएच-१४-सीएच-३२३२) संशयास्पदरीत्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू, डायरेक्टर स्पेशल पानमसाला आणि रजनीगंधा असे विविध तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.
पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा व स्कॉर्पिओ वाहन असा एकूण १३ लाख ७७ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी निसार हसनमिया शेख (वय ४९, रा. गवळीपुरा, स्टेशन रोड, नांदेड) याला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७९६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, २२३, २७४, २७५, ६२ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील कलम ५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तिडके करीत आहेत.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. डी. गाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतूक आणि विक्रीविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.




