विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर; सहकार पॅनलचा जाहीरनामा प्रकाशित, प्रचाराचा शुभारंभ

0
1

लातूर : प्रतिनिधी

विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आमच्याकडे वेळच नाही. आम्ही केलेले काम हेच आमचे उत्तर आहे. पारदर्शक नोकरभरती, शेतकरी, बचत गट, मजूर संस्था आणि पतसंस्था अशा सर्व घटकांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून मदत केली आहे. काय केले हे जनतेसमोर ठेवले असून, पुढील पाच वर्षांत काय करणार आहोत, याचाही संकल्प मांडला आहे. विरोधकांनी कशात आनंद मानायचा हे त्यांनी ठरवावे, अशा शब्दांत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ६ नोव्हेंबर रोजी सहकार पॅनलचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि विद्यमान चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशन व प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बोलत होते.

यावेळी महापौर जयश्री सोनकांबळे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, अशोकराव पाटील निलंगेकर, यशवंतराव पाटील, अभय साळुंके, शिवानंद हेंगणे, कल्याण पाटील, आशाताई भिसे, स्नेहल उटगे, स्वयंप्रभा पाटील, सुभाष घोडके यांच्यासह सहकार पॅनलचे सर्व उमेदवार उपस्थित होते.

सहकारात सहमतीचे राजकारण केले

गेल्या ३७ वर्षांच्या प्रवासात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेले काम सर्वांसमोर आहे. जिल्ह्यात सहकार क्षेत्रात काम करताना आम्ही नेहमीच सहमतीचे राजकारण केले. जिल्ह्याच्या विकासात सहमती हेच आमचे सूत्र राहिले आहे. शेतकरी आणि सामान्य माणसाचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठीच सर्वांना सोबत घेऊन काम केले. मी आणि बाबासाहेबांनी लातूर जिल्हा परिषद महाराष्ट्रात क्रमांक एकवर आणली. त्याच धर्तीवर जिल्हा बँकेतही काम करून बँकेला राज्यात नावारूपाला आणले. ही बँक जपण्याची जबाबदारी मतदारांची आहे. मतदारांनी आपली जबाबदारी विचारपूर्वक पार पाडून सहकार पॅनलच्या सर्व १५ जागांवरील उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले.

शिट्टीवर प्रचंड मतदान करून विरोधकांची शिट्टी वाजवा

विरोधक जाणीवपूर्वक बेछूट आरोप करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, मतदार सुज्ञ आहेत. लातूर जिल्ह्यातील सहकार चळवळ कोणाच्या हाती द्यायची, हे मतदार चांगल्या प्रकारे ओळखून आहेत. येत्या १५ नोव्हेंबर रोजी सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या शिट्टी या चिन्हावर प्रचंड मतदान करून विरोधकांची शिट्टी वाजवा, असे आवाहन बँकेचे विद्यमान चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनी केले.

विरोधकांचे खोटे बोल पण रेटून बोल सुरू

विरोधकांना सहकार क्षेत्राची माहिती नाही. निलंगा तालुक्यात सोसायट्या किती आहेत, बिगर कर्जदार सभासद किती आहेत, याचीही त्यांना माहिती नाही. सहकारातील माहिती नसताना केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी खोटे बोल पण रेटून बोल, अशी भूमिका घेतली जात आहे. तुम्हाला सहकारातील काहीही माहिती नाही आणि तुम्ही बँक चालवायला निघालात, अशा शब्दांत अशोकराव पाटील निलंगेकर यांनी विरोधकांचा समाचार घेतला. जिल्हा बँक टिकली तर सोसायट्या टिकतील आणि सोसायट्या टिकल्या तरच शेतकरी टिकेल. त्यामुळे सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पुढील पाच वर्षांसाठी विकासाचा संकल्प

सहकार पॅनलने पुढील पाच वर्षांत जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी आणि सहकार क्षेत्रातील विविध घटकांसाठी महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचा संकल्प जाहीरनाम्यात मांडला आहे.

महिला बचत गटांसाठी १०० कोटींची तरतूद

महिला बचत गटांसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असून, बचत गटातील महिलांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्जपुरवठा केला जाणार आहे.

गावागावांत मायक्रो एटीएम आणि आधार-सक्षम बँकिंग

गावागावांत मायक्रो एटीएम आणि आधार-सक्षम पेमेंट प्रणाली सुरू करून शेतकरी सभासद तसेच निराधार व्यक्तींना बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.

बँकेचा व्यवसाय १५ हजार कोटींपर्यंत नेणार

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा एकूण व्यवसाय १५ हजार कोटी रुपयांपर्यंत नेणे आणि वार्षिक नफा १०० कोटी रुपयांच्या स्तरावर कायम ठेवण्याचा संकल्प आहे. तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करून त्यांचा आर्थिक परतावा वाढविण्यात येणार आहे.

डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे ऑनलाइन कर्ज सुविधा

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत शेतकरी सभासदांना डिजिटल प्रणाली, व्हिडिओ केवायसी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने ऑनलाइन कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

एक लाख नवीन कर्जदार सभासद जोडणार

एक लाख नवीन कर्जदार सभासद जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, नव्याने सभासद झालेल्या शेतकऱ्यांना पीककर्जासह शेतीपूरक व्यवसायांसाठी विविध कर्ज योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मजूर संस्थांसाठी सुलभ कर्जप्रक्रिया

मजूर संस्थांना कर्ज उपलब्ध करून देताना सातबारा उताऱ्याची अट शिथिल करून कर्जप्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा संकल्प आहे.

बेरोजगार युवकांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी

बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र व राज्य शासन तसेच विविध महामंडळांच्या अनुदानाधारित आणि प्रोत्साहनपर कर्ज योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

बँक तिथे स्वतःची इमारत

ज्या ठिकाणी बँकेच्या शाखा आहेत, त्या ठिकाणी बँकेच्या मालकीच्या स्वतंत्र इमारती उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

प्रत्येक तालुक्यात नवीन बँक शाखा

बँकेच्या सेवा अधिक व्यापक करण्यासाठी आणि ग्राहकांना सुलभ बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात नवीन शाखा सुरू करण्याचा संकल्प जाहीरनाम्यात करण्यात आला आहे.

शेतकरी कुटुंबातील मुलींसाठी बिनव्याजी शुभमंगल कर्ज

शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी शुभमंगल कर्ज योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी व्यापक शैक्षणिक कर्ज सुविधा

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अधिकाधिक संधी मिळाव्यात, यासाठी सर्व प्रकारच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांचा समावेश शैक्षणिक कर्ज योजनेत करण्यात येणार आहे.

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संगणकीकरण

जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संपूर्ण संगणकीकरण करून त्यांचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि तंत्रज्ञानाधारित करण्याचा संकल्प सहकार पॅनलने जाहीरनाम्यात मांडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here