लातूर, १८ नोव्हेंबर २०२५ : लातूर पोलिसांच्या विशेष पथकाने तब्बल ३१ वर्षांपासून फरार असलेल्या घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक करून एक मोठी कामगिरी साधली आहे. १९९४ मध्ये घडलेल्या या गंभीर घरफोडी प्रकरणात आरोपी दीर्घकाळ पोलिस आणि न्यायालयापासून लपून राहत होता.
गांधी चौक पोलीस ठाण्यात गु.र.नं. २०/१९९४ अंतर्गत कलम ४५७, ३८०, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल होता. फिर्यादी दत्तू बाबू नवघन यांच्या झिन्नत सोसायटीतील घरात १० ते ११ फेब्रुवारी १९९४ दरम्यान चोरी झाली होती. तीन आरोपींनी घराचे कुलूप व कोंडी तोडून प्रवेश करून ₹११,००० रोख, २४ साड्या व इतर साहित्य असा एकूण ₹१६,४२५ किमतीचा मुद्देमाल चोरला होता. या प्रकरणातील एक आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.
विशेष पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी दिपक निवृत्ती कांबळे (वय ५५, रा. विलासनगर, लातूर) हे मागील काही दिवसांपासून विलासनगर परिसरात वास्तव्यास असल्याचे समोर आले. मिळालेल्या माहितीची पडताळणी केल्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी सकाळी पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकत त्याला ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सपोनि मनाळे, पोलीस अमलदार दत्तात्रय शिंदे, वालचंद नागरगोजे, योगेश गायकवाड व श्रीकांत कुंभार यांनी ही कारवाई केली.
लातूर पोलिसांनी डारमंड फाईलमधील या दीर्घ प्रलंबित गुन्ह्याचा उलगडा करून प्रशंसनीय कामगिरी बजावली असून अशा फरार आरोपींविरुद्ध कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगितले.



