लातूर : राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी गेल्या ७१ वर्षांपूर्वी सुरू केलेली चापोली ते कपिलधार ही महान पदयात्रा आजही परंपरेने सुरू आहे. या महायात्रेच्या निमित्ताने कार्तिक शुद्ध पौर्णिमा या पवित्र दिवशी कपिलधार (जि. बीड) येथे महात्मा बसेश्वर प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने झेंड्याचे स्वागत करून भव्य रिंगण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
सोहळ्याची सुरुवात झेंडा पूजन, अश्व (घोडा) पूजन, मृदंग वादकांचा गजर आणि गुरुवर्यांचा सत्काराने झाली. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. शिवहार बापूराव बिराजदार (वाडकर) यांनी सपत्नीक गुरुवर्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
रिंगण सोहळ्यात गुरुवर्यांचे रिंगण, विणेकरी रिंगण, झेंडेकरी रिंगण, मृदंग वादक रिंगण तसेच अश्व रिंगण मोठ्या भक्तिभावाने पार पडले. या प्रसंगी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या श्रद्धेने रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला.
सोहळ्यानंतर दिंडीने “मनमथ माऊली” कडे दर्शनासाठी प्रस्थान केले.
या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगन्नाथ अप्पा कोळंबे, पदाधिकारी गंगाधरआप्पा चावरे, शंकराप्पा मुरगे, अभिषेक बिराजदार, सिद्धेश्वर हुडगे, गुरुनाथ बिराजदार, विरभद्र आप्पा कमठाने, दयानंद मिटकरी, उन्हाळे सर, प्रशांत स्वामी, कैलास स्वामी, बाळू स्वामी, धीरज चीवटे, मल्लिकार्जुन सोनटक्के तसेच प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांनीही परिश्रम घेतले.


