आपसिंगा–काक्रंबा पाणीपुरवठा योजनेतील मोठा भ्रष्टाचार उघड

0
49

पाईपलाईन फक्त सव्वा ते दीड फुटावर पुरली; अधिकारी–गुत्तेदार संगनमताचा आरोप

तुळजापूर, प्रतिनिधी : तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा–काक्रंबा पाणीपुरवठा योजनेत मोठा भ्रष्टाचार उघड झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील काही अधिकाऱ्यांनी गुत्तेदारासोबत संगनमत ठेवून अंदाजपत्रकानुसार आवश्यक खोदकाम न करता, पाईपलाईन केवळ सव्वा ते दीड फुटावरच पुरल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी तर ग्रामपंचायतीच्या बंदिस्त नालीतच जलजीवन योजनेच्या पाईप टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर ९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता तथा प्रमुख चौकशी अधिकारी ए. एस. पाटील यांच्या आदेशानुसार सहाय्यक चौकशी अधिकारी ए. एस. राघूएम. एच. कुमटे यांनी गावातील पाणीपुरवठा योजनेची सखोल पाहणी केली. त्यांनी पाईपलाईन, फिल्टर विहीर, पाण्याची टाकी, मेन लाईन, ब्रिज आदी कामांची प्रत्यक्ष तपासणी केली असता कामात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जा, तफावत आणि चुकीची अंमलबजावणी आढळली.

गावातील काही नागरिकांनी आरोप केला की, खोदकाम न करता देखील बिल उचलण्यात आले, म्हणजेच सरकारी निधीचा मोठ्या प्रमाणात अपहार करण्यात आला आहे.

या चौकशीनंतर ग्रामस्थांनी संबंधित गुत्तेदारास काळ्या यादीत टाकावेभ्रष्ट अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. “जाणीवपूर्वक योजना फेल करणाऱ्या उपअभियंत्यावर कारवाई होणार का?” असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

तपासावेळी तक्रारदार अमीर शेख, माजी उपसरपंच दीपक सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्य महेश गोरे, ग्रामपंचायत सदस्य सुशांत रोकडे, चंद्रकांत डांगे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रवींद्र रोकडे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

गावातील पाणीपुरवठा योजना आजही अर्धवट अवस्थेत असून, कामाच्या निकृष्ट दर्ज्याबाबतचा हा घोटाळा उघड झाल्यानंतर वरिष्ठ अधिकारी आता काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here