वसुंधरा प्रतिष्ठान तर्फे लातूरमध्ये ‘रक्षकां’सोबत दिवाळी साजरी

0
113

तुम्ही आहात म्हणून….. पोलिसांच्या निस्वार्थ सेवेला कृतज्ञतेचा सलाम!

लातूर : दिवाळी म्हणजे आनंद, एकत्रता आणि प्रकाशाचा सण. परंतु या प्रकाशाच्या क्षणीही आपल्यासारख्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस ड्युटीवर असणारे काही खरे ‘रक्षक’ कायमच जागे असतात — ते म्हणजे आपले पोलिस कर्मचारी. त्यांच्या या निस्वार्थ सेवेला मानाचा मुजरा देण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठान, लातूर यांच्या वतीने एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत वसुंधरा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी लातूर शहरातील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात जाऊन अधिकारी आणि कर्मचारी यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच मिठाई वाटप करून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सणासुदीच्या काळात समाजाचे रक्षण करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत सण साजरा करू न शकणाऱ्या पोलिसांप्रती संस्थेने ‘आभार’ व्यक्त करण्याचा हा उपक्रम उबदार भावनेने पार पडला. या उपक्रमात पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, अध्यक्ष डॉ.अजित चिखलीकर, कार्याध्यक्ष अमोल आप्पा स्वामी, वृक्ष लागवड आणि संवर्धन अभियान प्रमुख राहुल माशाळकर, लातूर शहराध्यक्ष उमेश आप्पा ब्याकोडे, सदस्य सुग्रीव कांबळे, प्रसाद कुंभार यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य आणि पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “तुम्ही आहात म्हणून आम्ही आमच्या परिवारासोबत सर्व सण आणि उत्सव सुरक्षित पद्धतीने साजरी करू शकतो” असे ग्रीटिंग कार्ड वसुंधरा पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना यावेळी भेट दिले आणि त्यांच्या अविरत सेवेबद्दल आभार मानले.

पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपक्रम : राहुल माशाळकर

या उपक्रमाच्या अनुषंगाने बोलताना राहुल माशाळकर म्हणाले, वसुंधरा प्रतिष्ठान गेली अनेक वर्षे समाजसेवा, पर्यावरण संवर्धन, आणि मानवी मूल्यांचा प्रसार यासाठी कार्यरत आहे. या दिवाळीत ‘माणुसकीची दिवाळी’ साजरी करून सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवले होते. यंदा पोलिस दलासोबत दिवाळी साजरी करून त्यांनी समाजातील आणखी एका महत्त्वाच्या घटकाला सन्मान देण्याचे काम केले. मिठाई वाटपानंतर गप्पा, अनुभवविनिमय आणि आनंदमय वातावरणात हा उपक्रम पार पडला. शहरवासीयांनी या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करत, “वसुंधरा प्रतिष्ठानने पोलिसांबद्दल आदर आणि आपुलकी निर्माण करणारे उदाहरण घालून दिले,” असे मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here