नरसिंग बिरादार, उदगीर/जळकोट : जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या मुसळधार पावसामुळे उदगीर आणि जळकोट तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. घरात पाणी शिरणे, शेती वाहून जाणे, जनावरे मृत्युमुखी पडणे अशा अनेक समस्या निर्माण झाल्या. या पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार डॉ. राजेंद्र साळवी यांनी उदगीर व जळकोट तालुक्याची भेट घेतली.
या भेटीदरम्यान त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वखर्चातून शेतकऱ्यांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. या वेळी लातूर जिल्ह्याचे प्रमुख धर्माजी केंद्रे, जिल्हा संपर्कप्रमुख चंद्रकांत तुळे, तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. साळवी यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, “एकनाथ शिंदे साहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. शासन तुमच्या पुनर्वसनासाठी आणि शेती उभारीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.”
दरम्यान, माजी सभापती ब्रह्माजी केंद्रे यांनी देखील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या व त्यांना अन्नधान्य तसेच आवश्यक मदत पुरवली. सामाजिक कार्यात नेहमी अग्रस्थानी असणाऱ्या केंद्रे यांनी शेतकऱ्यांना पुढील काळातही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.



