राज्याचा उत्कृष्ट गणपती पुरस्कार मिळाल्याबद्दल बक्षीस वितरण, स्नेहमिलन कार्यक्रम
लातूर : पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून राज्यभरात लौकिक मिळविणाऱ्या वसुंधरा वृक्षरूपी गणेश मंडळ, लातूर तर्फे “कृतज्ञता सोहळा” आणि “दिवाळी स्नेहमिलन” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर हा सन्मानाचा सोहळा शुक्रवार, १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता पोद्दार शाळेजवळ औसा–बार्शी रिंग रोडवरील गजराज पॅलेस येथे पार पडणार आहे.
दयानंद शिक्षण संस्था, लातूर यांच्या वतीने आयोजित भव्य कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीस्मणजी लाहोटी तर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी (रो.ह.यो.) अहिल्या गाठाळ, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, संस्थेचे सचिव रमेश बियाणी तहसीलदार सौदागर तांदळे, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे, उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी रविंद्र क्षीरसागर, नर्मदा ट्रॅव्हल्सचे संचालक जगदीश स्वामी, प्राचार्य प्रो. प्रशांत मान्नीकर, युवा उद्योजक अनंतजी गायकवाड, पोलीस उपअधिक्षक (गृह) विनोदजी मेत्रेवार, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी शंकर साबरे आणि वन परिमंडळ अधिकारी निलेश बिराजदार हे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध हास्यकलावंत बालाजी सूळ करणार असून, कार्यक्रमात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक विषयांवर विचारमंथन होणार आहे. दयानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याच परंपरेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आहे.
कार्यक्रमात सन्मान सोहळा, बक्षीस वितरण, स्नेहभोजन, दिवाळी स्नेहमिलन आणि संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले असून, वसुंधरा परिवाराच्या विविध उपक्रमांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कार्यकर्ते, समाजसेवक आणि मान्यवरांचा सत्कार केला जाणार आहे.पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासह वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा, रक्तदान शिबिरे आणि सामाजिक जनजागृती या क्षेत्रांत वसुंधरा वृक्षरूपी गणेश मंडळाने केलेल्या कार्यामुळे लातूर शहरात एक आदर्श निर्माण झाला आहे. राज्य सरकारकडून मिळालेला सन्मान हा या सातत्यपूर्ण सामाजिक प्रयत्नांचा गौरव मानला जात आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिवाळीच्या मंगल वातावरणात समाजसेवक, पर्यावरणप्रेमी, नागरिक आणि वसुंधरा परिवारातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत. “हा कृतज्ञता सोहळा केवळ सन्मानाचा क्षण नसून, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीच्या दिशेने नव्या प्रेरणेचा आरंभ ठरेल,” असे वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले आहे.


