लातूर ग्रामीणमध्ये भाजपची कार्यकर्ता बैठक — आ. रमेशआप्पा कराड यांचे आवाहन

0
178

लातूर : भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत लातूर ग्रामीण मतदार संघातील जनतेच्या भावना जाणून घेऊन, जनतेच्या शिफारशीनुसारच उमेदवारी दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

आ. रमेशआप्पा कराड यांनी यावेळी बोलताना सांगितले की, लातूर ग्रामीण मतदार संघातील जवळपास सर्वच गावांमध्ये, वाड्या-वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली आहेत. शासनाच्या विविध योजनांमधून निधी मिळवून अनेक विकास उपक्रम राबविण्यात आले.

गेल्या महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे व पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यातील महायुती सरकारने मोठे मदत पॅकेज जाहीर करून दिलासा दिला आहे. “इतके मोठे पॅकेज याआधी कोणत्याही सरकारने दिले नव्हते,” असे ते म्हणाले.

संत श्री गोपाळबुवा महाराज साखर कारखान्याने राज्यात सर्वप्रथम विजयादशमीच्या दिवशी गाळप सुरू केले असून, दिवस-रात्र कारखाना कार्यरत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आ. कराड म्हणाले, “भाजप कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने काम केले पाहिजे. लातूर ग्रामीण मतदार संघातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शंभर टक्के विजय मिळविणे हे आपले लक्ष्य असावे.”

रेणापूर नगरपंचायत, रेणापूर पंचायत समिती आणि लातूर पंचायत समिती पुन्हा भाजपच्या ताब्यात याव्यात, यासाठी सर्वांनी जोमाने प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

या बैठकीस लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले, तर दशरथ सरवदे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here