पोलीस जिल्हा क्रीडा स्पर्धेचा उत्साहात समारोप : पोलीस मुख्यालय संघ सर्वसाधारण विजेता

0
121

लातूर, दि. १२ : लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप शनिवारी (दि. ११) बाभळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर झाला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. संजयजी भारुका यांच्या हस्ते या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी बोलताना श्री. भारुका म्हणाले की, “काळाच्या ओघात पोलिसांच्या कामाचे स्वरूप बदलत आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस शारीरिक व मानसिक दृष्ट्या कणखर असणे गरजेचे आहे. तणावमुक्त जीवनशैलीसाठी क्रीडा हा सर्वोत्तम मार्ग आहे.” तसेच लोकशाही व्यवस्थेत जनतेप्रती एकनिष्ठ राहून जबाबदारी पार पाडण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

या स्पर्धेत पोलीस मुख्यालय, चाकूर, अहमदपूर आणि निलंगा उपविभागातील संघांनी सहभाग घेतला. फूटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, खो-खो, कब्बडी, धावणे, गोळाफेक, लांबउडी, भालाफेक, थाळीफेक, तायक्वांदो अशा विविध स्पर्धांचा समावेश होता.

स्पर्धेत पोलीस मुख्यालयाच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. उत्कृष्ट महिला व पुरुष खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

समारोप प्रसंगी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, सीआरपीएफचे कमांडर श्री. पारसनाथ, असिस्टंट कमांडर श्री. विशाल कोरे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, तसेच उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे, रवींद्र चौधरी, गजानन भातलवंडे, साहेबराव नरवाडे, धुमे, रायबोले, कुमार चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी राखीव पोलीस निरीक्षक शेख गफ्फार, पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, क्रीडा प्रमुख रामलिंग शिंदे, युसुफअली धावडे, प्रशांत स्वामी, रियाज सौदागर, सुहास जाधव, प्रशिक्षक रौफ सय्यद आणि दयानंद गिरी यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here