मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय “ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान पुरस्कार वितरण सोहळा” मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नितीन पाटील (विशेष आयुक्त, वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र) तसेच यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
यावेळी राज्यातील दोन ज्येष्ठ पुरुष, दोन महिला, एक दिव्यांग व्यक्ती, एक तृतीयपंथी प्रतिनिधी आणि एका ज्येष्ठ नागरिक संघाला कृतज्ञता सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातून निवड झालेला ज्येष्ठ नागरिक संघ, क्रीडा संकुल लातूर यांना हा राज्यस्तरीय सन्मान मिळाला.
खासदार सुप्रिया सुळे आणि नितीन पाटील यांच्या हस्ते संघाचे अध्यक्ष आर. बी. जोशी, प्रकाश घादगिने आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांना मानपत्र, स्मृतीचिन्ह, ढाल आणि रोख बक्षीस रुपये १२,००० देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी संघाच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्याचे कौतुक करत “असेच भरीव आणि प्रेरणादायी कार्य सुरू राहो” अशा शुभेच्छा दिल्या. लातूरच्या या संघाच्या सन्मानामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र कौतुकाची लाट उमटली आहे.


