सरस्वती विद्यालयात ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांना 909 फळांची रोपं मोफत वितरित
लातूर : वसुंधरा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आणि बालविकास शिक्षण प्रसारक मंडळ, लातूर संचलित सरस्वती विद्यालय, खाडगाव (प्रकाश नगर, लातूर) येथे ‘एक विद्यार्थी : एक वृक्ष’ या उपक्रमांतर्गत तब्बल 909 झाडांचे मोफत वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांमध्ये हरित मूल्यांची जडणघडण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक फळांचे रोपं वितरित करण्यात आले.
याप्रसंगी वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा, अध्यक्ष डॉ. अजित चिखलीकर, शाळा संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब सूर्यवंशी, उपाध्यक्ष चंद्रकांत साळुंके, सचिव लक्ष्मणराव भागवत, मुख्याध्यापक हनुमंत गवळी, उपमुख्याध्यापक प्रशांत माने, तसेच पर्यवेक्षक हरिशचंद्र राठोड आणि संतोष मानकोसकर, शालेय समितीचे उपाध्यक्ष चंदूभाऊ साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना सांगितले की, “प्रत्येक विद्यार्थ्याने एक तरी झाड लावले आणि जगवले, तर पुढील पिढीसाठी हरित वारसा निर्माण होईल. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव तर निर्माण होईलच, शिवाय संपूर्ण परिसर हिरवागार होईल.” मुख्याध्यापक गवळी यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, “झाडे लावणे एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन करणे अधिक महत्त्वाचे आहे. आज दिलेली प्रत्येक रोपटी भविष्यात मोठे वृक्ष बनून पर्यावरणाला आधार देतील.” ‘वसुंधरा प्रतिष्ठान’ने राबविलेल्या या ‘एक विद्यार्थी : एक वृक्ष’ मोहिमेतून शेकडो कुटुंबांपर्यंत हरित संदेश पोहोचणार आहे. लहानग्यांच्या हातून रोपे वाटप होतानाचे दृश्य अतिशय मनोहारी होते.
माझं झाडं… माझं श्वास!
वसुंधरा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था गत दहा वर्षांपासून लातूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यात वृक्ष लागवड, संवर्धन आणि जनजागृती करते. विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष लागवड आणि संवर्धन याचे महत्व लक्षात यावे, यासाठी प्रतिष्ठानतर्फे ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ अभियान राबविण्यात येते. या अभियान अंतर्गत विविध शाळांत जाऊन ज्या विद्यार्थ्यांच्या घरी अथवा शेतात वृक्ष लागवडकरिता जागा उपलब्ध आहे त्यांना प्रत्येकी एक फळाचे रोपं मोफत दिले जाते. हे वृक्ष आईच्या नावाने लावून त्याचे संवर्धन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते. यावेळी ‘माझं झाडं… माझं श्वास’ या घोषणानी परिसर दणाणून गेला होता.


