लातूर : जवळगा गावचे माजी सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य, रामलिंग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र शासन आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त आणि लातूर विभागीय शिक्षण मंडळाचे सदस्य प्राचार्य रामलिंग मुळे यांनी गावकुसापासून जागतिक स्तरापर्यंत गगनभरारी घेतली आहे. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत रिसर्च युनिव्हर्सिटी, फ्लोरिडा (यूएसए) तर्फे त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.
आज नवी दिल्ली येथे प्राचार्य रामलिंग मुळे व सुरजकुमार रामलिंग मुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान “रामलिंगेश्वरचा ज्ञानयात्री” हा ग्रंथ गडकरी यांना भेट स्वरूपात प्रदान करण्यात आला. या भेटीत स्नेहपूर्ण संवाद साधण्यात आला. तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याच्या विविध उपक्रमांबाबत चर्चा झाली. प्राचार्य मुळे यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत असून त्यांच्या कार्याचा गौरव देश-विदेशात होत असल्याने जवळगाव परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. गावातील सामान्य माणसाच्या उन्नतीसाठी आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी घेतलेली धडपड आता जागतिक पातळीवर पोहोचली असल्याने हे यश संपूर्ण मराठवाड्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे.




