लातूर, शहर प्रतिनिधी : महाराष्ट्र जन सुरक्षा कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने लातूर शहरातील महात्मा गांधी चौक येथे आज तीव्र निदर्शने करण्यात आली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले.”काळा कायदा, लोकशाहीविरोधी निर्णय”महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्र जन सुरक्षा कायद्याला “काळा कायदा” ठरवित गंभीर आक्षेप घेतले. या कायद्यामुळे पोलिसांना अमर्याद अधिकार मिळतील आणि त्याचा गैरवापर राजकीय विरोधकांना दडपण्यासाठी होईल, असा आरोप करत आंदोलकांनी “हे सरकार निर्लज्ज आणि मस्तवाल आहे” अशा घोषणाबाजी केली. भगतसिंग होण्याची वेळ”या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी भाष्य करताना म्हटले की, या कायद्याची तुलना इंग्रजांच्या पब्लिक सिक्युरिटी ॲक्टशी करावी लागेल. इंग्रजांनी या कायद्याच्या जोरावर स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगात टाकले होते. तेव्हा भगतसिंग यांनी संसदेत बॉम्ब टाकून त्याचा निषेध केला होता. आज पुन्हा एकदा भगतसिंग होण्याची वेळ आली आहे. प्रत्येक देशभक्त नागरिकाने या कायद्याला विरोध केला पाहिजे. संविधान आणि लोकशाहीवर गदा”विचारवंत प्रा. डॉ. सोमनाथ रोडे यांनी या कायद्याला लोकशाहीचा गळा दाबणारा ठरवत तीव्र शब्दात निषेध केला. “हा कायदा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील मूळ तत्त्वांवर गदा आणणारा निर्णय आहे. जशा पद्धतीने जनतेने शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करायला सरकारला भाग पाडले, त्याचप्रमाणे हा जन सुरक्षा कायदाही रद्द व्हावा, असे ते म्हणाले. चळवळी कमकुवत करण्याचा प्रयत्न ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी आंदोलनात सहभागी होताना म्हटले की, चळवळींचा पाया कमकुवत करण्यासाठीच हा कायदा आणण्यात आला आहे. समाजातील सर्व स्तरातून या कायद्याचा निषेध होणे गरजेचे आहे आणि सरकारने तातडीने हा कायदा रद्द करावा. कायद्याच्या प्रतीची होळीया आंदोलनादरम्यान महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र जन सुरक्षा कायद्याच्या प्रतीची होळी करून सरकारविरोधातील आपला रोष व्यक्त केला. आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाचे नेते ॲड. उदय गवारे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष सोमवंशी, बालाजी रेड्डी, महानगर प्रमुख सुनील बसपुरे, काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष ॲड. किरण जाधव, काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲड. समद पटेल, अशोक गोविंदपुरकर, सुनिता चाळक, मनिषा कोकणे, कल्पना फरकांडे, सुलेखा कारेपूरकर, करुणा शिंदे, कल्पना मोरे, शीतल मोरे आदींसह महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




