लातूरमध्ये कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्राचा उपक्रम गाजला

0
334

गणेशोत्सवात डीजे बंद; लेझीम पथक व समाजप्रबोधनाचे अनोखे सादरीकरण

लातूर : कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र, लातूर येथील विद्यार्थी तसेच केंद्रातून यशस्वी झालेले विविध अधिकारी व कर्मचारी यांनी यंदाच्या गणेशोत्सवात एक आगळावेगळा उपक्रम राबवून लातूरकरांचे मन जिंकले आहे. लातूर पोलिस प्रशासनाच्या डीजे बंदच्या आवाहनानंतर या विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीम पथक उभारून गणेशभक्तांसमोर संस्कृती आणि समाजप्रबोधनाचा सुंदर मिलाफ सादर केला.

छत्रपती शिवाजी महाराज चौक व दयानंद गेट परिसरात लेझीमच्या तालावर सादर झालेल्या या पथकाने गणेशभक्तांचे मन मोहित केले. विशेष म्हणजे, या पथकात स्पर्धा परीक्षा केंद्रातून शिक्षण घेऊन पोलीस उपनिरीक्षक, महसूल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि पोलीस भरतीमध्ये यशस्वी झालेले अधिकारी सहभागी झाले होते. भावी प्रशासनाचा चेहरा असणाऱ्या या अधिकाऱ्यांनीच गणेशोत्सव कसा साजरा व्हावा याचा ‘लातूर पॅटर्न’ संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणला आहे.

कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्राचे विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियापासून ते प्रत्यक्ष उपस्थित गणेशभक्तांपर्यंत, सर्वत्र या संस्कृती-जतन उपक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here