लातूर : “यंदा आवाज कानावर नव्हे मनावर” या अनोख्या थीमवर आधारित लातूरातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत आपली कला सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बोलण्याची आणि ऐकण्याची क्षमता नसलेल्या या मुलांनी ढोल पथकाच्या तालावर गंजगोलाई परिसर दणाणून सोडला.
बाप्पा गणेश मंडळ व जीवन विकास प्रतिष्ठान संचलित ॲड. विजयगोपाल अग्रवाल मूकबधिर विद्यालयातील २५ दिव्यांग विद्यार्थ्यांनी शनिवारी झालेल्या विसर्जन मिरवणुकीत सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. गंजगोलाईतून निघालेल्या मिरवणुकीत त्यांनी भुसार लाईन, सुभाष चौक, दयाराम रोड परिसरात ठेका धरत मुकशक्तीची ताकद प्रभावीपणे दाखवून दिली.
या पथकाला क्रीडा शिक्षक महेश पाळणे, नंदकुमार थडकर तसेच बाप्पा गणेश मंडळाचे ढोल पथक प्रमुख विनय कलशेट्टी, अभिषेक राजपूत, शार्दूल ईटकर, आलोक वलाकट्टे, ऋषिकेश लांडगे, आदित्य कांबळे, अभय ढगे यांनी विशेष मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशटवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, माजी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा सक्षमीकरण अधिकारी राजू गायकवाड, जीवन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयसिंहराव देशमुख, तसेच बाप्पा गणेश मंडळाचे अध्यक्ष आशिष महिंद्रकर यांनी कौतुक केले.
दीड महिन्यांचा विशेष सराव
गेल्या दीड महिन्यांपासून या मुलांनी विसर्जन मिरवणुकीसाठी सातत्याने सराव केला. त्यांच्या सरावासाठी सांकेतिक भाषेचा उपयोग करण्यात आला. शिक्षक आणि मंडळाच्या चमूने इशाऱ्यांद्वारे ढोल वाजवण्याचे प्रशिक्षण दिले.
मराठवाड्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ढोल पथकाचा हा पहिलाच प्रयोग असून, तो अत्यंत यशस्वी ठरला.
या उपक्रमामुळे समाजात दिव्यांग व्यक्तींच्या कलागुणांना वाव मिळाला असून, “आवाज कानावर नसला तरी मनावर घुमतो,” हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.


