लातूर : गेल्या काही वर्षांत मराठवाड्याच्या अनुशेषात प्रचंड वाढ झाली असून, राज्यकर्त्यांच्या सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे हा अनुशेष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. परिणामी मराठवाड्याचे मागासलेपण अधिक ठळक झाले आहे. याबाबत गंभीर चिंता व्यक्त करत अनुशेषाची भरपाई करण्यासाठी शासन दरबारी ठोस पाठपुरावा करावा, अशी मागणी विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आमदार संजय बनसोडे यांच्याकडे केली.
या शिष्टमंडळाने आमदारांना भेट देऊन मराठवाड्याच्या अनुशेषाची माहिती सविस्तरपणे दिली. मराठवाड्यातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, शेतीसाठी आवश्यक प्रकल्प आणि शैक्षणिक संधी यामध्ये गंभीर तफावत असल्याचे नमूद करण्यात आले. या अनुशेष भरपाईसाठी राज्य सरकारने विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच यासाठी विधानसभेत आणि मंत्रालयीन पातळीवर ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मोईजभाई शेख, ऍडव्होकेट व्यंकट बेद्रे, नामदेव पाटील, सुंदरलाल पारीक यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार संजय बनसोडे यांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेत, शासन दरबारी विषय मांडण्याचे आश्वासन दिले.
मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनुशेषाचा प्रश्न तातडीने सोडविणे गरजेचे असून, या दिशेने सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याची आवश्यकता असल्याचे मत या प्रसंगी व्यक्त करण्यात आले.


