उदगीर : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे देवर्जन परिसरातील देव नदीने रौद्ररूप धारण केले आहे. नदी दुथडी भरून तब्बल दोन हजार फूट रुंदीने वाहत होती. एवढा जलप्रलय यापूर्वी कधीच पाहिला नसल्याचे वृद्ध नागरिक सांगत आहेत. नदीपात्रातून आलेल्या पुरामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने बसवराज रोडगे यांनी देव नदीचे रुंदीकरण व परळीकरण करण्याची मागणी केली. तसेच देवर्जन येथील नदीवरील पुलाची उंची वाढवणे गरजेचे असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. कारण या पुलावरून 15-20 गावांचा संपर्क तुटतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
या पाहणीदरम्यान मंडळाधिकारी विजयकुमार उस्तुरे, तलाठी आचमे, कृषी सहाय्यक सुजाता बनशेळकीकर व ग्रामसेवक मांडोळे उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
या आश्वासनामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात समाधान पसरले असून शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
ही गंभीर परिस्थिती पाहण्यासाठी उदगीर उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे स्वतः घटनास्थळी धावून आले. मुसळधार पावसात तीन किलोमीटर पायी चालून त्यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी माजी उपसरपंच सूर्यकांत रोडगे, हरीविठ्ठल रोडगे, बाळू पाटील, मनोज साकोळकर, माजी पंचायत समिती उपसभापती ईश्वर खटके, राजकुमार गरिबे, महेंद्र हाडोळे यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी शासनाच्या निकषांपेक्षा जास्त मदत मिळावी यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.


