29.5 C
New York
Sunday, July 6, 2025

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा-केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा आढावा

लातूर : केंद्र आणि राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या. लातूर येथील नवीन शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित विविध योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, लातूर शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त देविदास जाधव, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रमोद शिंदे आणि तहसीलदार सौदागर तांदळे उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. तसेच, मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहांची सुविधा उपलब्ध आहे. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मिळावा, यासाठी समाज कल्याण विभागाने विशेष प्रयत्न करावेत. कोणताही पात्र विद्यार्थी यापासून वंचित राहू नये. वसतिगृहात चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे श्री. आठवले यांनी सांगितले. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांचा आढावाही त्यांनी घेतला. या गुन्ह्यांतील पीडितांना शासकीय नियमानुसार तातडीने सहाय्य करावे आणि तपास जलद गतीने पूर्ण करावा, असे निर्देश दिले.

दिव्यांग बांधवांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांतून त्यांना सहाय्यभूत साधनांचे वाटप करावे, असे श्री. आठवले यांनी सांगितले. तसेच, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, सफाई कामगारांसाठीच्या योजना, अटल पेन्शन योजना आणि आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांचा आढावा त्यांनी घेतला.

लातूर जिल्ह्यात मुलींची १३ आणि मुलांची १२ अशी एकूण २५ शासकीय वसतिगृहे कार्यरत असून त्यांची एकूण प्रवेश क्षमता २ हजार ८४५ आहे. सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्यातील २ हजार ८७६ विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यावर्षीपासून तालुकास्तरावरही ही योजना राबविली जाणार असल्याचे समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांनी सांगितले.

गतवर्षी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या ३३ हजार १६१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला. तसेच, दिव्यांग बांधवांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेतून गेल्या तीन वर्षांत ११६ दाम्पत्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे सहाय्य देण्यात आल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी सांगितले.


Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles