20.3 C
New York
Sunday, July 6, 2025

अभाविप आयोजित डिपेक्स-२०२५ ची विभाग स्तरीय फेरी संपन्न

लातूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि सृजन ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित डिपेक्स-२०२५ प्रकल्प संकल्पना सादरीकरण फेरीचे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, छत्रपती संभाजीनगर, मॅजिक इन्क्युबेशन सेंटर आणि ए.आय.सी. बामू बजाज इन्क्युबेशन सेंटर यांच्या सहकार्याने यशस्वी आयोजन करण्यात आले.
या उपक्रमामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील सुमारे १०० संघांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी कृषी तंत्रज्ञान, संगणकीय बुद्धिमत्ता, संरक्षण आणि सायबर सुरक्षा, ऊर्जा, औद्योगिक स्वयंचलित प्रणाली, आरोग्य तंत्रज्ञान, वाहतूक, शाश्वत नागरी संरचना, सुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि मुक्त नवोपक्रम यांसारख्या विविध विषयांवर त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केल्या.
शैक्षणिक आणि औद्योगिक तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे आणि समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनाचे कौतुक केले. तसेच, त्यांनी मांडलेल्या संकल्पनांचे समाजावर आणि उद्योग क्षेत्रावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांची प्रशंसा केली. ही संकल्पना सादरीकरण फेरी अंतिम स्पर्धा-प्रदर्शनाकारीता प्रकल्पांची छाननी करण्याच्या प्रक्रियेतील प्राथमिक फेरी होती.
१९८६ ला उदयास आलेले डिपेक्स हे भारतातील सर्वात मोठे आणि प्रतिष्ठेचे राज्यस्तरीय प्रदर्शन-स्पर्धांपैकी एक आहे. हे व्यासपीठ महाराष्ट्र आणि गोवा येथील अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषीच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर आणि आयटीआय विद्यार्थ्यांना त्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करण्याची संधी प्रदान करते. या वर्षीची अंतिम स्पर्धा ३ ते ६ एप्रिल २०२५ दरम्यान सीओईपी ग्राउंड, पुणे येथे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सहकार्याने आयोजित केली जाईल.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर डॉ. मुनीश शर्मा (महासंचालक , एम. आय. टी.छत्रपती संभाजीनगर), श्री. सुनील किर्दक (व्यवस्थापकीय संचालक, किर्दक ऑटोकॉम प्रा. लि.), श्री. सौरभ भोगले (संचालक, आय इन्व्हेंट लॅब्स प्रा. लि.,), डॉ. संजय डंभारे (प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर), प्रा. अमित नेहेते (कार्यकारी समिती सदस्य, डीपेक्स-२०२५, एम. आय. टी. विश्वशांती विद्यापीठ, पुणे), वैभवी ढिवरे (प्रांत मंत्री, देवगिरी प्रांत, अभाविप), वैभव चव्हाण (संयोजक, तंत्र शिक्षण विद्यार्थी कार्य, देवगिरी प्रांत, अभाविप) आणि चिन्मय महाले (महानगर मंत्री, अभाविप, छत्रपती संभाजीनगर) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणांमधून नवसंशोधन आणि उद्योजकतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
गेल्या ३३ वर्षांपासून डिपेक्सला उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची जोड मिळाली आहे. हे व्यासपीठ विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करण्याची, आणि उद्योग, शिक्षण व समाजातील अग्रगण्य व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी देते. अशा उपक्रमांद्वारे अभाविप आणि सृजन ट्रस्ट युवा नवसंशोधकांना प्रेरित करत आहेत, जेणेकरून ते स्थानिक आणि जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करू शकतील आणि सर्जनशीलता व समस्या सोडवण्याची संस्कृती रुजवू शकतील.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles