20.3 C
New York
Sunday, July 6, 2025

“हर हर महादेव “च्या गजरात सिद्धेश्वर  यात्रेस प्रारंभ

मध्यरात्री गवळी समाजाने केला दुग्धाभिषेक, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

लातूर/ प्रतिनिधी : लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रेस अभुतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला. मध्यरात्री गवळी समाजाचा दुग्धाभिषेक झाल्यानंतर हजारोंच्या संख्येने रांगा लावलेल्या भक्तांनी “हर हर महादेव” चा गजर करत श्री सिद्धेश्वरांचे दर्शन घेतले. सकाळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांची यात्रा संपूर्ण मराठवाड्यासह सीमावर्ती भागात प्रसिद्ध आहे. २१ दिवस चालणाऱ्या या महोत्सवास मंगळवार व बुधवारच्या मध्यरात्री गवळी समाजाच्या दुर्गाभिषेकाने प्रारंभ झाला.परंपरेप्रमाणे गवळी समाजाने वाजत -गाजत मिरवणुकीने येत श्री सिद्धेश्वरांना दुधाचा अभिषेक केला. यावेळी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वरांची महापूजा आणि आरती करण्यात आली. यावेळी देवस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर देवस्थानच्या समोरील भागात ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे -विरोळे, तहसीलदार सौदागर तांदळे,ज्येष्ठ विश्वस्त विक्रमतात्या गोजमगुंडे,अशोक भोसले, श्रीनिवास लाहोटी, नरेश पंड्या, बाबासाहेब कोरे,व्यंकटेश हालिंगे, विशाल झांबरे यांच्यासह विश्वस्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मध्यरात्रीपासूनच शहरासह ग्रामीण भागातून आलेल्या हजारो भाविकांनी देवस्थान परिसरात दर्शनासाठी गर्दी केली होती. हर हर महादेवचा जयघोष करत भक्त रांगेत थांबले होते. गवळी समाजाच्या दुधाभिषेकानंतर दर्शनास सुरुवात झाली. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांगांची व्यवस्था देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे.भक्तांना दर्शन सुलभ व्हावे याकरिता प्रशासक व विश्वस्त मंडळाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत

रक्तदान शिबिरास प्रतिसाद…
यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने श्री सिद्धेश्वर देवस्थान आणि भालचंद्र रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.विशेष म्हणजे रक्तदात्याला श्री सिद्धेश्वरांचे थेट दर्शन देण्याची घोषणा देवस्थानच्या वतीने करण्यात आली होती.या शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

चोख बंदोबस्त...
महाशिवरात्री यात्रेनिमित्त दर्शनासाठी व यात्रेचा आनंद घेण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाच्या वतीने देवास्थान परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.खबरदारीच्या उपाययोजना प्रशासनाकडून राबवल्या जात आहेत. पोलीस प्रशासनाला देवस्थानच्या स्वयंसेवकांचेही सहकार्य लाभत असल्यामुळे दिवसभर हजारो भाविकांना सुलभपणे दर्शन घेता आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles