मुंबई : आपल्या व्यवसायात विद्युत सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या महाराष्ट्रातील कंत्राटदारांच्या संघटनेचा शताब्दी समारोप मुंबईतील पवई येथील वेस्टिन हॉटेलच्या भव्य सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष उमेश रेखे यांनी आगामी काळात संघटनेला राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे ध्येय जाहीर केले. त्याचप्रमाणे विद्युत सुरक्षेला शालेय अभ्यासक्रमात स्थान मिळवून देण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न करण्याचे सुतोवाच केले. आर. आर. काबेल या कंपनीचे अध्यक्ष श्री गोपाल काबरा हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने आले होते. कंत्राटदारांनी विद्युत सामानाच्या गुणवत्तेबद्दल अत्यंत जागृत राहावे आणि समाजाला विद्युत सुरक्षा पुरवावी अशी अपेक्षा श्री काबरा यांनी व्यक्त केली.
इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (इकॅम) या संघटनेची स्थापना जानेवारी १९२५ मध्ये झाली आणि २०२५ हे वर्ष शताब्दी वर्ष या नात्याने साजरे करण्यात आले. बुधवार १५ जानेवारी रोजी या शताब्दी वर्षाचा समारोप अत्यंत उत्साहाने संपन्न झाला. वेस्टिन या पंचतारांकित हॉटेलचे भव्य व आकर्षक सभागृह, प्रवेशद्वारापासून केलेली नेत्रदीपक सजावट, संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या विद्युत कंत्राटदारांचा सक्रीय सहभाग आणि विद्युत क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती यामुळे हा कार्यक्रम दर्जेदार व कायम स्वरुपी स्मरणात राहील असा झाला. या कार्यक्रमासाठी विद्युत क्षेत्रातील पॅनासोनीक, एल एण्ड टी, लेग्रॅण्ड, जीएम मोड्यूलर, 3एम, सुजीत इन्डस्ट्रीज, आर आर काबेल, पॉलिकॅब, ग्रेटव्हाईट, के-लाईट अशा आघाडीच्या कंपन्यांनी आपले प्रायोजिकत्व दिले होते. त्याचबरोबर मेको, सुप्रिम क्रीएशन, वाशी इन्टीग्रेटेड सोल्यूशन्स, आयएमसेफ, पॉवरटेक, श्री इंजिनिअरींग, कीट्रॉनिक्स, रोटोप्लास्ट या कंपन्यांचाही सहभाग होता.
संस्थेची ९९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्यानंतर समारोपाचा देखणा कार्यक्रम करण्यात आला. या प्रसंगी संस्थेच्या ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार करण्यात आला. आयईसीटी या संस्थेच्या मासिकाचे संपादन व प्रकाशन करणाऱ्या कॅम्पेन मास्टर्सच्या सतीश सिन्नरकर यांनी आपल्या २५ वर्षांच्या संपादकीय सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेचे महासचिव देवांग ठाकुर यांनी हा दिवस आपल्या आयुष्यातील आनंदाचा व भाग्याचा असून सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असे उद्गार काढले. आपली संघटना आर्थिक दृष्टीने स्वतंत्र असून येथे तरुण रक्ताला नेहमीच वाव देण्यात येतो आणि संघटनेचे काम करत असताना आपण सामाजिक भानही ठेवतो असे प्रतिपादन त्यांनी केले. यानंतर समारोपाचे भाषण करताना अध्यक्ष उमेश रेखे यांनी पूर्ण वर्षाचा आढावा घेतला आणि पुढील काळात संघटनेला मजबूत करून व नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करून सभासदांनी आपला उत्कर्ष साधावा असे आवाहन केले.
समारोपाच्या कार्यक्रमानंतर सर्वांच्या मनोरंजनासाठी हिंदी, मराठी गाण्यांचा सुरेख कार्यक्रम सादर करण्यात आला आणि सुग्रास भोजनाने या समारंभाचा समारोप झाला. प्रसिद्धी प्रमुख – सुरेश ईश्वर पोटे
