काटगाव, सोमेश्वर चलवा : लातूर तालुक्यातील काटगाव येथील मानव जीवन विकास प्रतिष्ठान, द्वारा संचलित साने गुरुजी आश्रम शाळा, स्वप्नभूमी येथे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार ११ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून आर.सी.सी. चे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर, प्रसिद्ध सर्जन तथा व्याख्याते डॉ. विठ्ठल लहाने, द्वारकादास श्याम कुमार ग्रुपचे मराठवाडा प्रमुख तुकाराम पाटील उपस्थीत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव जीवन विकास प्रतिष्ठान संस्थेचे सचिव तथा महाराष्ट्र राज्य आश्रम शाळा संस्थाचालक संघाचे अध्यक्ष शेषेराव चव्हाण होते. या कार्यक्रमाची सुरुवात सोमेश्वर चलवा यांच्या संगीत चमुच्या स्वागत गीत व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली.
विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देणारे व्यासपीठ म्हणजेच वार्षिक स्नेहसंमेलन होया आणि या व्यासपीठावरून आपल्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येने पालकांची उपस्थित होती त्यामध्ये विशेषत: महिलांची उपस्थिती दर्शनीय होती.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाटक, गाणी आणि देशभक्तीपर सादरीकरणांमुळे संपूर्ण वातावरण आनंदमय झाले. शाळेच्या इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पुलवामा हल्ला या देशभक्ती गीतावर केलेल्या नृत्य विशेष आकर्षण ठरले. लहान मुलांच्या आई मला खेळायला जायचे या“नृत्य सादरीकरणाने” प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्था अध्यक्ष शेषराव चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन गायकवाड विलास व आभार रियाज पठाण यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष रोहित चव्हाण, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
