लातूर : शाहू चौक येथील मिलिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक दिनकर केंद्रे यांचा सेवानिवृत्तीबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
समता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राहुल माने यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. तब्बल ३४ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दिनकर केंद्रे हे सेवानिवृत्त झाले. त्याबद्दल संस्था पतसंस्था व विविध विभागाच्या वतीने केंद्रे यांचा स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष तथा प्राचार्य अंगदराव तांदळे, उपप्राचार्य भालचंद्र येडवे, पतसंस्थेचे चेअरमन प्रा. बिपिन गायकवाड, सिद्धार्थचे प्राचार्य संजय जगताप, मुख्याध्यापक विजय गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य बब्रुवान माने व सचिव मीनाताई माने यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य अंगदराव तांदळे यांनी केले. सूत्रसंचालन बालाजी माने तर आभार प्रा.डॉ.सुरेश बडोले यांनी मानले. यावेळी सहसचिव सारिका कदम, स्वाती कांबळे आदींसह कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
