हाळी हंडरगुळी : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी गावात विजेचा लपंडाव वाढला असून दिवसांतून लाईट कधीही जाते अन् कधीही येते. कुठे व्यत्यय आहे, काय अडचण आहे याचा काहीच ताळमेळ नाही. लाईट गेली की लाईनमनची धावपळ सुरू होते. मात्र परत कोणत्या तरी कारणाने पुन्हा जाते. ही कहाणी झाली आहे हाळी हंडरगुळी गावातील विजपुरवठ्याची. गावात नेहमीच विजपुरवठा खंडीत होत असल्याने महावितरणच्या कारभाराला नागरिक पुरते वैतागले आहेत.
हाळी हंडरगुळी गावात विज पुरवठा करण्यासाठी बसवण्यात आलेल्या डी. पीं.वर जास्तीचा भार वाढल्याने त्यात सतत बिघाड होत चालला आहे. परिणामी विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत चालला आहे. लाईट बील वेळेवर भरणारे नियमीत वीज बील भरतात. तर आकडेवाले बील न भरताच लाईटचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढत चालल्याचे बोलले जात आहे. हाळी गावातील घोगरे डी.पी., ढोर गल्ली डी.पी., बसस्थानक परिसर, हंडरगुळी गावातील जनावरांचा बाजार, पाण्याची टाकी आदी भागातील डी.पी. नेहमी उघड्याच असतात. सर्वच डी.पी.वर वाढलेल्या भारामुळे नेहमी वीज गुल होत आहे. तर कधी कमी-जास्त दाबामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान होत आहे.
सतत खंडीत होणाऱ्या विद्युत पुरवठ्याचा परिणाम विद्युत यंत्रणेवर आधारीत असलेल्या छोट्या-मोठ्या व्यवसायावर होत आहे. दिवसा, रात्री केव्हाही लाईट जाते आणि कधीही येते. मुख्य म्हणजे रोज सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत भारनियमन आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वीजेचा अधिक वापर होत आहे. वाऱ्याची झुळूक आल्यावरही वीज वाऱ्याबरोबर काही वेळ गायब होत असल्याची चर्चा नागरिक करतात. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.