लातूर शहर ठरला ‘ग्रामीण टी 10’चा चॅम्पियन 

0
208

लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिपमध्ये पटकावले १ लाखाचे प्रथम पारितोषिक; गतविजेता रेणापूर उपविजेता

लातूर : लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला (दि.25) लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या अंतिम सामन्यात लातूर शहर संघाने बाजी मारत लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनशिपचा किताब पटकावला आहे. तर रेणापूर उपविजेता ठरला आहे. लातूर शहर संघाला 1 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक आणि गोल्डन ट्रॉफी तर रेणापूर संघाला 51 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘लातूर ग्रामीण’चे आमदार श्री. धिरज देशमुख यांच्या पुढाकारातून क्रिकेटरसिक युवकांसाठी ‘लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियशिप : ग्रामीण टी 10’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचा चॅम्पियन होण्यासाठी रेणापूर आणि लातूर शहर संघात रोमहर्षक अंतिम लढत झाली. यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, वैशालीताई विलासराव देशमुख, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, धिरज देशमुख, दीपशिखा धिरज देशमुख, वंश धिरज देशमुख, दिवियाना धिरज देशमुख, त्र्यंबक भिसे, डॉ. शिवाजी काळगे आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी लोकनेते विलासराव देशमुख गोल्डन ट्रॉफीचे अनावरण माजी मंत्री, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख आणि विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सिनेअभिनेते रितेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेणापूरच्या रेणुका क्रिकेट क्लब संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या लातूर शहरातील ए. के. युवामंच क्रिकेट क्लबने 10 षटकात 5 गडी गमावत 141 धावांचे आव्हान उभे केले. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या रेणापूर संघाच्या सलामीच्या फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजी केली. त्यांनी पहिल्या 3 षटकात 50 धावा जोडल्या. त्यानंतर सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झाल्याने सामना रंगतदार स्थितीत पोहचला. रेणापूरला विजयासाठी शेवटच्या षटकांत 30 धावांची गरज असताना रेणापूरने केवळ 16 धावा केल्याने विजयाने हुलकावणी दिली.

आमदार धिरज देशमुख यांच्या हस्ते लातूर शहर संघाचे कर्णधार मियाँखान पठाण यांनी 1 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक, गोल्डन ट्रॉफी तर उपविजेता ठरलेला रेणापूरचा संघ व कर्णधार बालाजी दुड्डे यांना 50 हजारांचे द्वितीय पारितोषिक, मेडल देण्यात आले. उत्कृष्ठ गोलंदाजीचा किताब सलाम शेख (लातूर शहर) यांना तर, उत्कृष्ठ फलंदाजीचा किताब युनुस मणियार (अहमदपूर) यांना देण्यात आला. मालिकावीरचा किताब एम अहमद ( लातूर शहर) यांना देण्यात आला. यावेळी यशवंतराव पाटील, सर्जेराव मोरे, श्रीपती काकडे, विजय देशमुख, रविंद्र काळे, सत्यजित देशमुख, अनंतराव देशमुख, श्रीशैल उटगे, संभाजी सूळ, प्रमोद जाधव, अनुप शेळके, सुनील पडिले, उमाकांत खलंग्रे, शेषराव हाके, किरण जाधव, सचिन पाटील, सचिन दाताळ, सुभाष घोडके, रमेश सूर्यवंशी, इम्रान सय्यद आदीसह क्रिडाप्रेमी उपस्थित होते.

अंतिम सामन्यापूर्वी मुलींच्या पिंक आणि पर्पल संघात सामना झाला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात पर्पल संघाने पिंक संघावर मात केली. दिव्या मस्के सामनावीर ठरली.

‘ग्रामीण टी 10’मुळे ग्रामीण
भागातील टॅलेंट पुढे येईल – रितेश देशमुख

आमदार धिरज देशमुख यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. धिरज क्रिकेटचे चाहते आहेत, ग्रामीण भागातील युवकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस होता. त्याला मूर्त रूप मिळतेय, याचा आनंद आहे.
ग्रामीण टी 10 ही स्पर्धा कौतुकास्पद आहे. गावातील तरुणांना पुढे येण्यासाठी संधी मिळत नाही. अशांसाठी ही स्पर्धा असून या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला खेळ आणि खेळाडू पुढे येतील. खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा होता. तो पुढाकार ग्रामीण टी 10 घेतला आहे. गावातील टॅलेंट ही स्पर्धा पुढे आणेल त्यामुळे ही स्पर्धा लातूरपूरती मर्यादित रहायला नको, असे सिनेअभिनेते रितेश देशमुख यांनी यावेळी सांगितले.

खेळाडू, प्रेषकांचा चांगला प्रतिसाद – आ. धिरज देशमुख

सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, आई वैशालीताई देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख आणि मांजरा परिवाराच्या सहकार्याने तिसऱ्यांदा लोकनेते विलासराव देशमुख क्रिकेट चॅम्पियनचे यशस्वी आयोजन केले. खेळाडू, क्रीडारसिक, प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद लाभतो आहे, याचा मनस्वी आनंद आहे, अशी भावना ग्रामीण टी 10 संकल्पनेचे प्रमुख, आमदार धिरज देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here