अहमदपूर – शहर आणि ग्रामीण भागातील तरुण महिलांनी अनादी काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा झुगारून देऊन खास करून तरुण स्त्रियांनी आपला विवेक जागृत ठेवून वाचन चिंतन करून नवतंत्रज्ञानकडे सकारात्मकतेने पहावे आणि लिहिते व्हावे असे आग्रही प्रतिपादन समारोप सोहळ्याच्या खुल्या अधिवेशनात प्रमुख अतिथी सातार्याच्या सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अॅड. वर्षाताई देशपांडे यांनी केले.
त्या रविवारी मराठी भाषा पंधरवाडा सोहळ्याच्या निमित्ताने कॉ. श्रीनिवाजी काळे स्मृती प्रतिष्ठान व मराठवाडा साहित्य परिषद शाखा अहमदपूरच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठवाडा साहित्य परिषदेचे नववे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलत होत्या.
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बीडच्या सुप्रसिद्ध लेखिका अॅड. उषाताई दराडे या होत्या. यावेळी विचारमंचावर मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष किरण सगर, कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, साहित्यिका ललिता गादगे, अहमदपूर शाखेचे अध्यक्ष सत्यनारायण काळे, कार्यवाह हरिदास तंम्मेवार, स्वागताध्यक्ष अॅड. ज्योती काळे, कार्याध्यक्ष प्राचार्य रेखाताई हाके पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना अॅड. वर्षाताई देशपांडे म्हणाल्या की, आपल्यातली महिला उदासीन असल्याचे सांगून ती ग्रंथालयात जात नाही, लढण्यास तयार नसते म्हणून स्त्रियांचा प्रवास विचार करायला लावणारा असून 30 ते 50 वयोगटात कसल्याही प्रकाराचे महिलांचे साहित्य नाही, 30 टक्क्याहून अधिक लग्न बालविवाहात होतात, ऊसतोड महिलांच्या समस्या त्यांच्या गर्भाशयाच्या पिशव्या यावर विशेष लक्ष दिले गेले पाहिजे, महिलांच्या भ्रुणहत्या बंद झाल्या पाहिजेत, जन्मापासून मृत्यूपर्यंतचे वेगवेगळे विषय घेऊन लिहिते झालं पाहिजे असे जाहीर आवाहन केले.
यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा सुप्रसिद्ध लेखिका उषा दराडे म्हणाल्या की, भारतीय समाजामध्ये चारित्रय फक्त स्त्रियांचे पाहिले जाते, पुरुषाचे नाही. चारित्रयचा विषय करून महिलांना राजकारण, समाजकारण, अर्थकारण यापासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्या चारित्रय संशय करून त्यांचा आत्मविश्वास कमी केला जातो. त्यामुळे स्त्रियांनी या पुरुषी डावापासून वेळीच खबरदारी घ्यावी व सर्वच क्षेत्रांमध्ये खंबीर उभे राहावं असं जाहीर आवाहन केलं.
यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकर यांची शिदोरी घेऊन महिलांनी व्यक्त झालं पाहिजे. राष्ट्रमाता जिजाऊ, झाशीची राणी, अहिल्यादेवी यांचा आदर्श घेऊन स्वस्थ न बसता लढायला शिकलं पाहिजे. चळवळी शिवाय नेतृत्व तयार होत नाही म्हणून महिलांनी घर सांभाळून परिवर्तनाच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं असं सांगितलं.
याप्रसंगी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष सत्यनारायण काळे, स्वागत अध्यक्ष अॅड. ज्योती काळे, साहित्यिका ललिता गादगे ,म सा प चे विभागीय अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांचे मनोगत पर भाषणे झाली
सोहळ्याचे प्रास्ताविक मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह हरिदास तम्मेवार यांनी ठराववाचन कार्यवाह दादा गोरे यांनी, परीचय आणि सूत्रसंचालन आशा रोडगे तत्तापुरे यांनी तर आभार प्राचार्य रेखाताई हाके पाटील यांनी मांनले.
या समारोप सोहळ्याला आमदार बाबासाहेब पाटील, डॉ.अशोकराव सांगवीकर, प्राचार्य वसंत बिराजदार, प्रा. गोविंद शेळके, ज्ञानदीप अकॅडमीचे उदध्व ईप्पर, भारत रेड्डी, राज्य विक्रीकर आयुक्त शिवाजी जाधव, प्रा. निशिकांत देशपांडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
मराठवाडा साहित्य परिषद च्या वतीने अहमदपूर शाखेच्या पदाधिकार्यांच्या संमेलन यशस्वी केल्याबद्दल कोतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संयोजन समितीच्या वतीने संम्मेलनाला देणगी देणार्या देणगीदाराचा सन्मान करण्यात आला.
सोहळा यशस्वी करण्यासाठी मोहीब कादरी, महेंद्र खंडागळे, प्रा. अनिल चवळे, राम तत्तापुरे, उदय जोशी, प्रा नानासाहेब सूर्यवंशी, प्रा दीपक बेले, जिलानी शेख, गंगाधर याचवाड, प्रा. द मा माने, प्रा गुरूनाथ चवळे,अनिल फुलारी, डॉ. एन एस पाटील, भागवत येनगे, अविनाश धडे,प्रदिप फुलसे यांच्यासह मराठवाडा साहित्य परिषदेच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.