अहमदपूर दि.08 – करणी, भानामती, भूतबाधा, पिशाच्च आणि इतर या सह सर्व अंधश्रद्धा असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत ठेवून ज्ञान आत्मसात करावे आणि आपले जीवन सुंदर घडवावे असे आग्रही प्रतिपादन अनिसचे राज्य कार्यकारणी सदस्य ह.भ.प हरिदास तम्मेवार यांनी केले.
ते दि. 8 रोजी यशवंत विद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विज्ञान बोधवाहिनी अभ्यासभेट उपक्रम फिरते थ्रीडी नभांगनाची माहिती प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य गजानन शिंदे, उप मुख्याध्यापक राजकुमार घोटे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, कपिल बिराजदार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना श्री हरिदास तमेवार म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये खगोल विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सतत प्रयत्नशील असून या उपक्रमांतर्गत फिरते थ्रीडी नभांगन याचा लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचा शुभारंभ आणि तिच्या जागर गीताने करण्यात आला. प्रारंभी हरिदास तम्मेवार यांचा शाळेच्या वतीने प्राचार्य गजानन शिंदे यांच्या हस्ते शाल आणि ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम तत्तापूरे यांनी सूत्रसंचालन कपिल बिराजदार यांनी तर आभार राजेश कज्जेवाड यांनी मांनले.