कर्तव्यदक्ष मनपा कर्मचाऱ्यांची जोरदार कारवाई
लातूर : थकित मालमत्ता करापोटी मनपाने वसुली मोहीम तीव्र केली असून मंगळवारी एकाच दिवसात १२ गाळ्यांना सील ठोकण्यात आले. पालिकेने एकाच दिवसात १८ लाख २ हजार ५४७ रुपयांचा करही वसूल केला.
मनपाच्या मालकीची शहरात व्यापारी संकुले आहेत.या संकुलातील कांही गाळेधारकांनी मालमत्ता कर थकवला आहे.या गाळेधारकांकडे असणारा कर वसूल करण्यासाठी पालिकेने ही विशेष वसुली मोहीम राबवली.
मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांच्या आदेशान्वये मंगळवार २८ मे रोजी पहिल्याच दिवशी उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, मालमत्ता व्यवस्थापक रवी कांबळे यांच्या उपस्थितीत ही कार्यवाही करण्यात आली. वसुली पथकाने एकूण १२ गाळे सील करून १८ लाख २ हजार ५४७ रुपयांचा कर वसूल केला.

मनपाच्या मालकीच्या गांधी चौक येथील व्यापारी संकुलातील दोन गाळे सील करण्यात आले.त्या गाळेधारकांकडून १४ लाख २ हजार रुपयांची वसुली केली गेली. संबंधितांनी रकमेचे धनादेश वसुली कर्मचाऱ्यांना सोपवले.२ लाख रुपये रोख भरणा केला. गांधी मार्केट व्यापारी संकुलातील एक, गंजगोलाई व्यापारी संकुलातील दोन तसेच गांधी मैदान साईट क्रमांक १११ व ११२ व्यापारी संकुलातील सात गाळे पथकाने सील केले.या व्यापारी संकुलात धनादेशाद्वारे २ लाख रुपयांचा कर वसूल झाला.
शहरातील व्यापारी संकुलात असणाऱ्या ज्या गाळेधारकांकडे थकबाकी आहे त्यांनी आपल्याकडील बाकीचा भरणा तात्काळ करून मनपाला सहकार्य करावे. जे गाळेधारक थकबाकी भरणार नाहीत त्यांच्यावर याच पद्धतीने कार्यवाही केली जाईल,असा इशाराही उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे यांनी दिला आहे.