हाळी हंडरगुळी – उदगीर तालुक्यातील हाळी येथे पाणीटंचाई जाणवत असल्याने पाण्याच्या शोधात फिरावे लागत आहे. हे ओळखून तांबोळी कुटूंबिय स्वतः:च्या बोअरचे पाणी पुरवत आहे. दररोज पाचशेपेक्षा अधिक घागर पाणी नागरिक घेऊन जातात.
हाळी गावात दरवर्षी पाणीटंचाई असते. आता हाळीकरांची पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे. गावात कायमस्वरूपी पाणी योजनेचे काम सुरू आहे. सध्या आठ ते दहा दिवसांतून नळाला पाणी येते. पण ते पाणी पिण्यायोग्य नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी आड, हातपंप, बोअर चा आधार घ्यावा लागतोय. पण यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने जलस्त्रोतांची पाणीपातळी खालावली आहे. काही बोअर, हातपंप बंद पडले आहेत. येथील आदर्श नगरातील युनुस तांबोळी यांच्या बोअरला पाणी असल्याने ते नागरिकांना स्वखर्चातून मोफत पाणी देत आहेत. दररोज पाचशेपेक्षा अधिक घागरी पाणी दिले जाते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी आधार मिळत आहे.
