20.8 C
New York
Saturday, July 5, 2025

शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

लातूर जिल्ह्यातील २२ कार्यालयांचा समावेश

लातूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या लातूर जिल्ह्यातील २२ शासकीय कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी यांचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विभागस्तर आणि राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, कार्यकारी अभियंता देवेंद्र नीलकंठ, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त मंगेश शिंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मूल्यमापनात लातूर येथील ३ विभागस्तरीय कार्यालये आणि ४ जिल्हास्तरीय कार्यालयांनी राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागामध्ये लातूर येथील इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला. पशुसंवर्धन विभागामध्ये लातूर येथील सहआयुक्त, पशुसंवर्धन यांच्या कार्यालयाने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच परिवहन विभागामध्ये लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला.

जिल्हा कार्यालयांमध्ये पशुसंवर्धन विभागात लातूर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला, तर माहिती व जनसंपर्क विभागात लातूर जिल्हा माहिती कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये लातूर येथील कार्यकारी अभियंता कार्यालयाने, तसेच लातूर जिल्हा कारागृह अधीक्षक यांच्या कार्यालयाने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

पहिल्या टप्प्यात उदगीर उपविभागीय कार्यालयाने विभागात द्वितीय, चाकूर तहसीलदार कार्यालयाने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. यासोबत, औसा नगरपरिषद, लातूर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे लातूर उपविभागीय अभियंता कार्यालय, खरोळा पशुधन विकास अधिकारी, औसा सार्वजनिक बांधकाम विभाग उप अभियंता कार्यालय, किल्लारी ग्रामीण महावितरण उपविभागीय अभियंता कार्यालय, लातूर उपविभागीय जलसंधारण अधिकारी कार्यालय, औसा दुय्यम निबंधक कार्यालय, अहमदपूर तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय यांनीही या मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या सर्व कार्यालयांचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांचा जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत लातूर जिल्ह्यातील २२ कार्यालयांनी उत्कृष्ट कामगिरी कली असून जिल्हा प्रशासनासाठी ही बाब अभिमानास्पद आहे. यापुढेही सर्वच शासकीय कार्यालयांनी चांगली कामगिरी करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे म्हणाल्या.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालय प्रमुखांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.


Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles