लातूर : विनापरवाना जिलेटिन कांड्या व डेटोनेटरची वाहतूक करणाऱ्या राहुल बालाजी ढाबळे, वय 34 वर्ष, राहणार पानचिंचोली तालुका निलंगा या ट्रॅक्टर चालकाला पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या विशेष पथकाने दिनांक 10 मार्च रोजी छापा मारून ताब्यात घेतले. पुढील कार्यवाही औसा पोलीस करीत असून नमूद इसमास अटक केली आहे. त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष पथकाने त्याच्याकडून 93 जिलेटिन कांड्या व 4 डेटोनेटर तसेच ट्रॅक्टर, वायर, कॉम्प्रेसिव्ह इंजन, असा 10 लाख 54 हजारांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांनी फिर्याद दाखल केली. दहा मार्च सोमवारी ही कारवाई करण्यात आली. औसा तालुक्यातील देवांग्रा शेत शिवारात एक जण ट्रॅक्टरमधून स्फोटक पदार्थांचा साठा बाळगून आहे अशी माहिती विशेष पथकाला मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी दुपारी दोन वाजता विशेष पथकाने देवंग्रा शेत शिवारात छापा मारून संशयित ट्रॅक्टरची पाहणी केली असता त्याच्याकडे डेटोनेटर, वायर, तसेच जिलेटिन कांड्या सापडल्या. चालकाकडे स्फोटक पदार्थ वाहतुकीचा परवाना नसून तसेच या पदार्थांची बिलेही त्याला सादर करता आले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी सदरच्या जिलेटिन कांड्या, डेटोनेटर तसेच ट्रॅक्टर जप्त केला. त्याच्याकडून ट्रॅक्टरसह जिलेटिन कांड्या व डेटोनेटर हे स्फोटक पदार्थ अस 10 लाख 54 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात दहशतवाद विरोधी शाखेचे विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक फौजदार जाधव, अंगद कोतवाड, पोलीस अंमलदार रामहरी भोसले युसुफ शेख तसेच पोलीस ठाणे औसा चे पोलिस अंमलदार माने यांनी केली आहे.
