उदगीर : उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने उत्कृष्ट, शोध व विकास वार्ता गटातील पुरस्काराचे वितरण आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. खा. डॉ.शिवाजीराव काळगे, माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते मराठवाडास्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक संचालक श्याम टरके यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार एम.बी. पटवारी व ज्येष्ठ पत्रकार चंद्रचकोर कारखाने यांना जीवन गौरव पुरस्कार व मानपत्र ,स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच मराठवाड्यातील उत्कृष्ट शोध वार्ता विकास वार्ता संदीप शिंदे ,बालाजी बिराजदार, बालाजी थेटे, गणेश जाधव, युवराज धोत्रे, डी.ए. कांबळे, सुशील देशमुख, संग्राम वाघमारे, सचिन चोबे ,केतन ढवन ,गोकुळ पवार, गोरख भुसाळे ,नवनाथ इधाते, गोकुळ पवार ,सुशील देशमुख ,रवींद्र सोनवणे ,संगम डोंगरे ,बाबासाहेब उमाटे ,संजय पाटील, अंबादास जाधव, शिवशंकर टाक यांना रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी खा.डॉ. शिवाजीराव काळगे यांनी त्यांच्या भाषणात पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रश्न सुटू शकतात. मुद्रीत माध्यमांचे आजही विश्वासामुळे महत्व अबाधित आहे असे सांगत, आपल्याला मिळालेल्या संधीचा उपयोग समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी व्हावा अशी अपेक्षाही व्यक्त केली. यावेळी आ. बनसोडे यांनी पत्रकार हे समाज शिक्षक असतात पत्रकारितेच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना अनेक सूचना मिळत असतात. राजकारणी व पत्रकार एकत्र येऊन समाजातील प्रश्नांची सोडवणूक व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत पत्रकारांच्या अनेक प्रश्नांसाठी आपण पुढाकार घेवू असे आश्वासन दिले. तसेच लातूर व उदगीर परिसरातील विकास साधण्यासाठी मी व खा. काळगे एकत्रित प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, पत्रकार अंबादास जाधव, उमरगा यांनी या स्पर्धेतून पत्रकारांना प्रोत्साहन मिळते हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगत संयोजकांचे आभार मानले. प्रारंभी कार्याध्यक्ष ॲड.एल.पी.उगीले, सहसचिव प्रा. वसंत गोखले, पत्रकार बालाजी कवठेकर महेश मठपती यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी साकेत संजय दुंगे यांनी लहान मुलीचा पाण्यात बुडताना प्राण वाचवल्यामुळे मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्षीय समारोपात श्याम टरके यांनी गौरवशाली मराठी पत्रकारितेचा उल्लेख करून उदगीरच्या पत्रकारांनी महत्त्वपूर्ण कार्य करून पत्रकारांना प्रोत्साहन पर पारितोषिके दिल्याबद्दल अभिनंदन करून हा उल्लेखनीय सोहळा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रवीण जाहुरे यांनी केले आभार रवींद्र हसरगुंडे यांनी मानले.
