पहिल्याच प्रयोगात 64 दिव्यांग विद्यार्थ्यांनी दिली राष्ट्रध्वजाला सलामी
लातूर : कानावर शब्द पडत नाहीत त्यामुळे ऐकण्याचा प्रश्नच नाही तरीही बँड पथकाच्या कंपाचा आधार घेत लातूरच्या मुकबधिर विद्यार्थ्यांनी रविवारी क्रीडा संकुल येथे झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात हिरीरीने सहभाग घेत सामान्यांनानाही लाजवेल असे संचलन करीत राष्ट्रध्वजाला सलामी दिली. राज्यातील दिव्यांगासाठीच्या हा पहिलाच प्रयोग असला तरी या विद्यार्थ्यांनी उपस्थितींची मने जिंकली.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी क्रीडा संकुलाच्या मैदानावर मुख्य ध्वजारोहण झाले. यावेळी विविध तुकडयांचे संचलन झाले. यात इतिहासात प्रथमताच दिव्यांग विद्यार्थ्यांनी भाग घेत ‘ हम भी कुछ कम नहीं’ हे दाखवून दिले. शहरातील ॲड. विजयगोपाल अग्रवाल मुकबधिर विद्यालय व सौ. सुशिलादेवी देशमुख मुलींचे निवासी मुकबधिर विद्यालयातील 64 जणांच्या तुकडीने शानदार संचलन करीत उपस्थितांच्या टाळया मिळविल्या. मुलांच्या तुकडीचे नेतृत्व प्रवीण दावलबाजे या विद्यार्थ्यांने तर मुलींच्या तुकडीचे नेतृत्व आदिती यादव हिने केले. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत जिल्हा संचालनात सहभाग दिला.
समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग लातूर विभागात राबविण्यात येत असून हा उपक्रम सर्व महाराष्ट्रासाठी पथदर्शक ठरणार आहे. याची सुरूवात विशेषत: लातूर जिल्हयातून झाली आहे. या स्काऊट गाईडच्या उपक्रमात लातूर जिल्हयातील 11 मुकबधिर विद्यालयातील जवळपास 260 मुकबधिर मुलांमुलींनी नोंदणी करून आपला सहभाग नोंदविला आहे. सदर उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी,स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक डॉ. शंकर चामे, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता राजु गायकवाड, सहायक सल्लागार बाळासाहेब वाकडे, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग कार्यालयातील लिपीक प्रमोद शिंदे, स्काऊट गाईडचे प्रमुख संघटक महेश पाळणे, क्रीडा शिक्षक प्रशांत कुलकर्णी, नंदकुमार थडकर, नामदेव भालेकर, विशेष शिक्षक प्रवीण कदम, रामेश्वर गवरे, सिंधू इंगळे, मीरा परजणे यांनी परिश्रम घेतले.
पालकमंत्र्यांनीही केले कौतुक …
लातूरचे नवनिर्वाचित पालकमंत्री मा. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या नाविण्यपुर्ण उपक्रमाचे कौतुक केले. तसेच मा.पालकमंत्री यांनाही या दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत फोटो घेण्याचा मोह आवरला नाही. सामान्यांसोबत दिव्यांग विद्यार्थीही या संचलनात हिरीरीने भाग घेतल्याने पालकमंत्री यांनी या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. क्रीडा संकुलात ध्वजारोहणावेळी उपस्थित नागरिकांनीही या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संचलन कलेला भरभरून प्रतिसाद दिला.
