लातूर (30 सप्टेंबर) : किरकोळ कारणावरून अपहरण, जबरी चोरी आणि खून करणाऱ्या आरोपीस लातूर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अटक केली आहे.
29 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 1.30 वाजता रेणापुर नाका, लातूर येथे ही घटना घडली. मयत अमिरअली सय्यद हे आपल्या सहकाऱ्यांसोबत सायगाव (ता. अंबाजोगाई, जि. बीड) कडे जात होते. दरम्यान, ऑटोला धक्का लागल्याने वाद निर्माण झाला. या वादात समीर नावाच्या इसमाने आणि त्याच्या सोबतीच्या ऑटोचालकाने अमिरअली यांना हाताने व चाकूने मारहाण केली. त्यांचा मोबाईल हिसकावून घेऊन, जबरदस्ती ऑटोमध्ये बसवून रिंगरोडवरील हॉटेल अण्णा व्हेज-नॉनव्हेजजवळ चाकूने वार करून अमिरअली यांचा खून केला.
या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या पथकाने गुन्ह्यातील आरोपी शेख समीर दिलावर (वय 26, रा. साई रोड, आर्वी, लातूर) याला अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार आणि ऑटो जप्त केला आहे. तसेच एक विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात घेण्यात आले आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अन्नाराव खोडेवाड, वसंत मुळे, पोउपनि रेडेकर व कर्मचारी खुर्रम काझी, सुनिल हराळे, रविंद्र गोंदकर, यशपाल कांबळे, रणविर देशमुख, धैर्यशिल मुळे, सचिन राठोड, गणेश यादव, आनंद हल्लाळे, दयानंद उपासे, महेबुब शेख आणि चालक दिपक कांबळे यांनी मोलाची भूमिका बजावली.




