30 C
New York
Tuesday, July 8, 2025

औसा येथील तक्षशिला बुद्ध विहार विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन

बुद्ध विहाराच्या माध्यमातून गौतम बुद्धांचे शांतता आणि समानतेचे विचार समाजापर्यंत पोहोचतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

लातूर : औसा येथील तक्षशिला बुद्ध विहार विकास कामांचे लोकार्पण करताना अतिशय आनंद होत आहे. या बुद्ध विहाराच्या माध्यमातून गौतम बुद्धांचे शांतता आणि समानतेचे विचार समाजापर्यंत पोहचण्यास मदत होणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

औसा येथील तक्षशीला बुद्धविहार विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजननिमित्त विजय मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ना. आठवले बोलत होते. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार बसवराज पाटील, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, औसा-रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार घनश्याम अडसूळ, भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भंते पय्यानंद, औसा नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. शिंदे यांच्यासह तक्षशिला बुद्ध विहार समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

गौतम बुद्धांच्या विचारांचा अंगीकार करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी प्रयत्न केले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील प्रत्येक व्यक्तीला समानतेची वागणूक मिळावे, अशी त्यांची भूमिका होती. सर्व जाती-धर्मांच्या कल्याणाचा विचार करून त्यांनी भारतीय राज्यघटना तयार केली, असे ना. आठवले म्हणाले. औसा परिसरात आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून सर्व समाज घटकांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. जवळपास 110 गावांमधे त्यांनी समाज भवन बांधकामासाठी सहाय्य केले असून औसा येथील तक्षशीला बुद्ध विहारासाठी 2 कोटी रुपये निधी त्यांनी दिला आहे. त्यामुळे गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रसार होवून समाजाच्या विकासाला हातभार लाभेल, असे ना. आठवले म्हणाले.

औसा येथील बुद्ध विहार आणि येथे होत असलेल्या विविध कामांमुळे याठिकाणी येणाऱ्या उपासकांना चांगल्या सुविधा निर्माण होणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यावेळी म्हणाले.

तक्षशीला बुद्ध विहार येथील विविध कामांसाठी 2 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याठिकाणी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करून समाजातील युवकांना स्पर्धा परीक्षा पूर्वतयारीसठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासह विविध विकास कामांसाठी निधी देणार असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले. तसेच सर्व समाजाला सोबत घेऊन विकास कामे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी मंत्री बसवराज पाटील यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात भिख्खू संघाच्या वतीने आमदार अभिमन्यू पवार यांना गौतम बुद्धांची मूर्ती आणि मानपत्र देण्यात आले. भंते पय्यानंद यांनी मानपत्रचे वाचन केले.

भंते सुमेधजी नागसेन, भंते नागसेन बोधी, भंते धम्मसार, तक्षशिला बुद्ध विहार ट्रस्टचे अशोक बनसोडे, राजेंद्र बनसोडे यावेळी उपस्थित होते. माजी नगरसेविका कल्पना डांगे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रारंभी औसा येथील तक्षशिला बुद्ध विहार येथील टप्पा-1 मधील विकास कामांचे लोकार्पण आणि टप्पा 2 मधील विकास कामांचे भूमिपूजन केंद्रीय सामजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

तक्षशिला बुद्ध विहार विकास कामांच्या पहिल्या टप्प्यात ध्यानधारणा केंद्र इमारतीचे बांधकाम व नूतनीकरण, प्रवेशद्वार ते ध्यानधारणा केंद्रापर्यंत पायऱ्या, तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीसाठी चबुतरा, विद्युतीकरण आदी कामांचा सामावेश आहे. तसेच याठिकाणी प्रवेशद्वार, संरक्षण भिंत, उद्यान विकसित करणे आदी कामे दुसऱ्या टप्प्यात होणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles