लातूर : जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे करिता आनंदी जीवनशैली व तणाव मुक्तीचे तंत्र या विषयावर दिनांक 15 जून रोजी दयानंद सभागृह येथे ए.डी.एम. ऍग्रो इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि.लातूर यांचे सहकार्याने एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रेरणादायी वक्ते दिलीप औटी, मुंबई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे वर सततच्या धावपळीमुळे व अतिरिक्त कामाच्या ताणामुळे त्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होत असतो. पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वास्थ्य निरोगी राहण्यासाठी त्यांना समुपदेशन व मार्गदर्शन होणे गरजेचे आहे याकरिता सोमय मुंडे पोलीस अधीक्षक, लातूर यांच्या संकल्पनेतून सदरची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेत लातूर जिल्हा पोलीस आस्थापना वरील पोलीस अधिकारी, अंमलदार व पोलीस कुटुंबीय, मिळून सुमारे 800 च्या वर लोक उपस्थित होते.
सदर कार्यशाळेत मेडिटेशन, वेळेचे महत्व व व्यवस्थापन, मानसिक तणावाचे व्यवस्थापन, आर्थिक बाबींचे व्यवस्थापन, शारीरिक स्वास्थ्य कसे राखावे, जनतेशी सुसंवाद, स्वतःमध्ये बदल घडवून अपडेट कसे रहावे, भविष्यातील आव्हानांचा सामना कसा करावा, मोबाईलचा वापर, कुटुंबाचे व्यवस्थापन आदी विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस दलाकरिता अशा पद्धतीची उपयुक्त कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कडून समाधान व्यक्त करण्यात आले.
कार्यशाळे च्या शेवटी ए.डी.एम. ऍग्रो इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि. यांना व मार्गदर्शक श्री दिलीप औटी यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आभार श्री अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक, लातूर यांनी केले, तर सूत्रसंचालन सहा. पोलीस निरीक्षक, श्री दयानंद पाटील यांनी केले.